राज ठाकरे यांचे प्रतिपादन
मुंबई व अन्य महापालिकांच्या अखत्यारित असलेल्या प्रत्येक मैदानात पर्जन्य जलसंधारण योजना राबविल्यास पिण्याच्या पाण्याची मोठय़ा प्रमाणावर बचत होऊ शकेल, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी येथे सांगितले.
मनसेतर्फे शिवाजी पार्क मैदानावर राबविण्यात येणाऱ्या पर्जन्य जलसंधारण प्रकल्पाच्या कामास सोमवारी सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. मी शिवसेनेमध्ये असताना पर्जन्य जलसंधारणाची संकल्पना तत्कालीन महापौर विशाखा राऊत यांच्याकडे मांडली होती. आता ही योजना आम्ही राबविल्यानंतर पालिकेतील सत्ताधारी अन्य मैदानांत ती राबवतील, असा टोला त्यांनी हाणला.
शिवाजी पार्कवर ही योजना राबविताना अनेक अडचणी आल्या. प्रत्येक टप्प्यावर अडवणूक करण्यात आली. शिवाजी पार्कवर सीआरझेड कुठून आले ते कळलेच नाही. परमेश्वराने फुकट दिलेले पाणी आपण जपून वापरण्याची गरज आहे. ही योजना मनसेने पालिकेवर आर्थिक भार न टाकता राबविली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही ही योजना राबविल्यानंतर अनेकांना ती राबवावीशी वाटेल, असा टोला त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता लगावला.