20 January 2018

News Flash

नद्यानाल्यांच्या खोलीकरण, रुंदीकरणातून जलसंधारण

जलयुक्त शिवार अभियानंतर्गत विविध जलस्रोतातील ६३७.२७ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.

प्रतिनिधी, मुंबई | Updated: March 31, 2016 3:05 AM

सरकारचा खुलासा
नद्यानाल्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी व जलसंधारणासाठी पात्रांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येत असून, जलसंधारण क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्लामसलत करूनच राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असल्याचा खुलासा राज्य सरकारने केला आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘घोटाळायुक्त शिवार’ या वृत्तमालिकेत ‘जलयुक्त शिवार’ अभियानाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्दय़ांबाबत सरकारने हे स्पष्टीकरण दिले आहे.
जलयुक्त शिवार अभियानंतर्गत विविध जलस्रोतातील ६३७.२७ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तसेच खोलीकरण आणि रुंदीकरणाचे २५८१ किलोमीटर लांबीचे काम झाले असून, त्यापैकी ८५४ किमी लांबीचे काम लोकसहभागातून करण्यात आले आहे. तसेच खोलीकरण आणि रुंदीकरण हे तांत्रिक समितीच्या शिफारशी व मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येत असल्याचे खुलाशात म्हटले आहे.
कामाची गुणवत्ता राखण्यासाठी समवर्ती मूल्यमापन, त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन, डिजिटल फोटो अपलोड करणे, ग्रामसभेच्या मान्यतेने तक्रार नसल्याची खात्री करून शेवटचे बिल अदा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पावसाचे पाणी जास्तीतजास्त गावाच्या शिवारात अडवून विकेंद्रित स्वरूपाचे पाणीसाठे निर्माण करणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे आणि पाण्याबाबत गाव स्वयंपूर्ण करणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
या अभियानांतर्गत होत असलेल्या बहुतांश जिल्ह्यांतील कामांची जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग यांनी पाहणी करून मार्गदर्शन केलेले असल्याने कामाच्या तांत्रिकतेचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे खुलाशात नमूद करण्यात आले आहे.

First Published on March 31, 2016 3:05 am

Web Title: water conservation water management
टॅग Water Conservation
  1. No Comments.