23 January 2020

News Flash

आज दिलासा, उद्या संकट?

तलावांत सध्या ५१ टक्के पाणी जमा झाले असले तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

निम्मा जलसाठा असतानाही पाणीकपात रद्द; पाऊस व्यवस्थित न झाल्यास टंचाईचे सावट

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात सध्या अवघा ५१ टक्के साठा असताना राजकीय दबावापोटी पालिका प्रशासनाने मुंबईतील १० टक्के पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. जर येत्या दोन महिन्यांत पुरेसा पाऊस पडून तलावांत पुरेसा पाणीसाठा न झाल्यास मुंबईकरांवर वर्षभर पाणीसंकट उद्भवण्याची चिन्हे आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे ऊध्र्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी या सात तलावांत मिळून शुक्रवारी सध्या ७ लाख ४३ हजार ५३१ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. सातही तलावात मिळून १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला तरच मुंबईची वर्षभराची पाण्याची मागणी पूर्ण होऊ  शकते. त्या दृष्टीनेच पाण्याचे नियोजन केले जाते. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे पावसाचे चार महिने पूर्ण झाले की ऑक्टोबर महिन्यात पाणीसाठय़ाचा अंदाज घेऊन पाणी कपातीचा निर्णय घेतला जातो. गेल्या वर्षी सन २०१८ मध्ये पावसाने दमदार सुरुवात केली आणि नंतरच्या टप्प्यात धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडलाच नाही. ऑक्टोबर महिन्यात तलावात ९ टक्के पाण्याची तूट होती. त्यामुळे अखेर नोव्हेंबर २०१८ पासून पाणीकपात लागू करावी लागली होती.

तलावांत सध्या ५१ टक्के पाणी जमा झाले असले तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. सातही तलावांचे पाणलोटक्षेत्र व्यापक असल्यामुळे हे तलाव भरण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन येत्या दोन- अडीच महिन्यांत धरणक्षेत्रात पाऊस पुरेसा पडला नाही तर पुढच्या वर्षीही पाणी कपातीला मुंबईकरांना तोंड द्यावे लागणार आहे.  यापूर्वीही २००९, २०१४, २०१६ मध्ये पाणीकपात करण्यात आली होती. २००९ मध्ये मुंबईत इतकी पाणीटंचाई निर्माण झाली होती की बांधकामांचे पाणीही कापावे लागले होते. तर जलतरण तलावही बंद ठेवावे लागले होते. त्यावर्षी खासगी विहिरी, बोअरवेल ताब्यात घेण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. पुढील दोन महिन्यांत पाऊस न पडल्यास हीच वेळ ओढवू शकते.

दूरदृष्टीचा अभाव

पाणीपुरवठय़ात वाढ करण्यासाठी सरकारने नेमलेल्या चितळे समितीने महापालिकेच्या वतीने गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्पांच्या विकासाचे काम हाती घेण्याची शिफारस केली होती. मागील दहा ते बारा वर्षांपासून या प्रकल्पांची केवळ चर्चा आहे. यापैकी गारगाई आणि पिंजाळ प्रकल्पांसाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती. परंतु त्यानंतरही हा प्रकल्प कागदावरच आहे. या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामुळे बाधित होणाऱ्या खासगी तसेच शासकीय जमिनी ताब्यात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या असलेल्या सात धरणांवरच मुंबईकरांची पाण्याची तहान भागणार आहे.

वर्षां जलसंचय कागदावरच

पिण्याव्यतिरिक्तच्या वापरासाठी पालिकेने इमारतींमध्ये वर्षां जलसंचय करण्याची सक्ती केली होती. मात्र अनेक इमारतींमध्ये ही योजना राबवली जातच नाही, त्यावर पालिकेचा कोणताही अंकुश नाही. तर सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठीचे सात प्रकल्पही अद्याप सुरू होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे मुंबईकरांची सगळी भिस्त सात तलावांतील पाणीसाठय़ावरच आहे.

First Published on July 20, 2019 12:57 am

Web Title: water cut can be canceled even after half of its reservoir abn 97
Next Stories
1 शिवसेनाप्रमुखांची जयंती, पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करावी
2 डोंगरी दुर्घटनेतील मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
3 मुंबई उपनगरी मार्गावर २९ प्रवाशांचे अपघात ; गुरुवारी १६ जणांचा मृत्यू
Just Now!
X