धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पावसाचा लपंडाव, गतवर्षांच्या तुलनेत जलसाठय़ात निर्माण झालेली प्रचंड तूट यामुळे जलाशयांमध्ये ३४ टक्केम्हणजे साधारण १३३ दिवसांची गरज पूर्ण करेल एवढेच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने बुधवार, ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठय़ाचा आढावा घेऊन पालिकेच्या जलविभागाने ५ ऑगस्टपासून मुंबईत २० टक्केपाणीकपात करण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना सादर केला होता. त्याला आयुक्तांनी मंजुरी दिली.

मुंबई महापालिकेमार्फत ठाणे आणि भिवंडी परिसरांतील काही गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. तेथील पाणीपुरवठय़ातही २० टक्केकपात करण्यात येणार आहे. तुळशी जलाशय २८ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला. मात्र उर्वरित सहा जलाशयांच्या क्षेत्रांत जूनपासूनच पावसाचा लपंडाव सुरू आहे.

केवळ ३४ टक्के शिल्लक

जलाशयांमध्ये ३१ जुलैला चार लाख ९९ हजार १९९ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा (३४ टक्के) आहे. मुंबईकरांना साधारण १३३ दिवस पुरेल इतकेच पाणी आता जलाशयांमध्ये आहे. गेल्या वर्षी ३१ जुलै २०१९ रोजी १२ लाख ४० हजार १२२ दशलक्ष लिटर (८५.६८ टक्के), तर ३१ जुलै २०१८ रोजी १२ लाख ०५ हजार ५९६ दशलक्ष लिटर (८३.३० टक्के) पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जलाशयांमध्ये सात लाख ५० हजार ९२३ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची तूट आहे.

..पण पाणी कोठून आणणार? 

करोनाचा संसर्ग टाळायचा असेल तर हात सतत साबण-पाण्याने धुणे, स्वच्छता बाळगणे आवश्यक आहे. तसे आवाहन पालिका आणि सरकारतर्फे सतत केले जाते. परंतु आता पाणीकपात होणार असल्याने ज्या ठिकाणी मुळातच कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, तेथील रहिवाशांचे हाल होणार आहेत. पाणीकपात किती दिवस असेल, याबाबतही अनिश्चितता आहे.