मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये तूर्तास समाधानकारक जलसाठा उपलब्ध असला तरी पाणलोट क्षेत्रात ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण असमाधानकारक आहे. ऑगस्टमध्ये पावसाची स्थिती अशीच राहिल्यास सप्टेंबरमध्ये पाणी कपातीबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत जल विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा, मध्य वैतरणामध्ये आजघडीला ९,०१,१८२ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच काळात तलावांमध्ये १२,४९,९८१ दशलक्ष लिटर पाणी होते. सध्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा लपंडाव सुरू झाला असून पालिका अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. ऑगस्टमध्ये तलावांमध्ये किमान १२ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा असायला हवा होता. पावसाळ्याचा दीड महिना शिल्लक राहिला असून १ ऑक्टोबर रोजी तलावात १४ लाख दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध झाले तर मुंबईकरांना वर्षभर पुरेसा पाणीपुरवठा करणे पालिकेला शक्य होणार आहे.
तलावांतील सध्याचा उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता ऑगस्टमध्ये पावसाचा लपंडाव सुरूच राहिला तर सप्टेंबरमध्ये मुंबईकरांवर पाणी कपात लागू करावी लागेल, अशी शक्यता जल विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र समाधानकारक पाऊस पडल्यास पाणी कपातीचे संकट टळू शकेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.