महिनाअखेरीस ठोस निर्णय
मुंबईच्या तलावांमध्ये पुढील आठ महिन्यांसाठी पुरेल एवढा पाणीसाठा असला तरी मान्सूनच्या माघारीचा अंदाज घेत सध्याच्या पाणीकपातीत आणखी दहा टक्के वाढ करण्याबाबत पालिकेत चर्चा सुरू आहे. ही वाढ झाल्यास पाणीकपात ३० टक्क्य़ांवर जाईल. पाणीकपातीमुळे उपनगरातील अनेक भागात पाण्याच्या समस्या सुरू झाल्या असून कपात वाढवल्यास या समस्यांमध्ये भर पडण्याची शक्यता आहे. मात्र १ ऑक्टोबरला पाणीसाठय़ाचा अंदाज घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, असे अधिकृतरित्या सांगण्यात आले.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये सप्टेंबरअखेरीस १४ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाल्यास पुढील दहा महिन्यांसाठी तो पुरेसा ठरतो. सध्या जलाशयांमध्ये ९ लाख ९१ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. मुंबईत सरासरी ३७५० दशलक्ष लिटर पाणी दरदिवशी पुरवले जाते. त्यानुसार हा साठा आठ महिन्यांसाठी पुरेसा आहे. त्यातच सध्या केलेल्या पाणीकपातीमुळे तो आणखी एक ते दीड महिना पुरवता येऊ शकेल. मात्र सप्टेंबरमध्ये पावसाची शक्यता नसल्याने असलेला साठा जपून वापरण्याचे धोरण पालिकेने अवलंबिले आहे.
सध्या शहरात वीस टक्के पाणीकपात सुरू आहे. यात आणखी दहा टक्के पाणीकपात करण्याविषयी चर्चा सुरू आहे. मात्र पाण्याच्या असमतोल पुरवठय़ामुळे उपनगरात सुरू झालेल्या समस्या लक्षात घेता पाणीकपातीतील वाढ अधिक त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय घेतला गेलेला नाही. त्यातच पावसामुळे पाणीसाठय़ात काही प्रमाणात वाढ होईल, अशी आशाही आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार सप्टेंबरमधील पुढच्या आठवडय़ात पावसाची शक्यता आहे. एक ऑक्टोबर रोजी पाणीसाठय़ाचा अंदाज घेतला जाईल, असे जलअभियंता विभागाचे उपायुक्त रमेश बांबळे यांनी सांगितले.