दराडे दाम्पत्यापाठोपाठ मुखर्जीवरही गंडांतर; दोन्ही बंगल्यांचा आग्रह

शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याने आपल्याला मलबार हिल येथील जल अभियंत्यांचा बंगला वास्तव्यासाठी द्यावा, या मागणीवर महापौर विश्वनाथ महाडेश्वर ठाम असून या बंगल्याजवळच असलेला दुसराही बंगला आपल्यालाच द्यावा अशी नवी मागणी महापौरांनी केली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने हे बंगले रिकामे करण्याचा निर्णय घेत त्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. महापौरांच्या नव्या मागणीमुळे आता दराडे दाम्पत्याबरोबरच पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांच्या बंगल्यावरही गंडांतर येणार आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानामध्ये (राणीची बाग) उद्यान अधीक्षकांसाठी बंगला बांधण्यात आला आहे.  पूर्वी या बंगल्यामध्ये उद्यान अधीक्षक वास्तव्यास होते.  दरम्यानच्या काळात पालिकेतील अतिरिक्त आयुक्तपदी सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक झाली आणि त्यांच्या निवासाची व्यवस्था उद्यान अधीक्षकांच्या बंगल्यात करण्यात आली. त्यामुळे उद्यान अधीक्षक मात्र बेघर झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी सध्याचा महापौर बंगला रिकामा करावा लागणार असल्याने महापौरांच्या निवासासाठी प्रशासनाने राणीच्या बागेतील या बंगल्याची निवड केली होती. मात्र विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा बंगला स्वीकारण्यास नकार दिला आहे. पालिकेने मलबार हिल जलाशयाजवळ जल अभियंत्यांसाठी बांधलेल्या बंगल्यामध्ये पूर्वी मुख्य जल अभियंते वास्तव्याला होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या बंगल्यामध्ये अतिरिक्त आयुक्तांचे वास्तव्य होते. आता सनदी अधिकारी प्रवीण दराडे आणि पल्लवी दराडे यांचे या बंगल्यामध्ये वास्तव्य आहे. त्याच्या जवळच असलेल्या दुसऱ्या बंगल्यात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी वास्तव्यास आहेत. जल अभियंत्यांचा बंगला महापौर निवासस्थान म्हणून आपल्याला द्यावा, अशी  मागणी विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली आहे. शिवसेनेनेही महापौरांसाठी या बंगल्याचा आग्रह धरला आहे.

प्रशासनाने मुंबईतील गृहनिर्माण सोसायटय़ांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांची एक यादी महापौरांना सादर केली असून यापैकी एका भूखंडाची निवड केल्यास तेथे महापौर बंगला उभारण्यात येईल, अशी तयारी प्रशासनाने दर्शविली होती. मात्र प्रशासनाकडून अशी कोणतीच यादी आपल्याला प्राप्त झालेली नाही, असे  महाडेश्वर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा पर्याय निकालात निघाला आहे. परिणामी आता पालिकेने दराडे दाम्पत्याचे वास्तव्य असलेला मलबार हिल येथील बंगला रिकामा करण्याचा निर्णय घेतला असून त्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात येणार असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.