पावसाच्या संततधारेने ठाणे जिल्ह्य़ात एकीकडे पूरस्थिती निर्माण झाली असली तरी तलावातील पाणीसाठय़ात भरघोस वाढ होत असल्याने मुंबईवरील पाणीसंकट दूर होण्याची चिन्हे आहेत. गेल्या तीन दिवसांत तलावातील जलसाठा दुपटीहून अधिक वाढला आहे. गेल्या १० वर्षांच्या सरासरीपेक्षाही यंदाचा जलसाठा अधिक झाला आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत पावसाची इनिंग सुरू राहिल्याने मे महिन्यातही तलावातील पाणीसाठा मुबलक होता. त्यामुळे एक महिना पावसाने दडी मारल्यावरही जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाणीकपात केली गेली नाही. ११ जुलै रोजी तलावातील पाण्याने सर्वात खालची पातळी गाठली. त्यानंतर मध्यम सरींनी पाणीसाठा थेंबे थेंबे वाढवत नेला. २८ जुलै रोजी तो तीन लाख ७३ हजार दशलक्ष लिटरवर पोहोचला. त्यानंतरच्या तीन दिवसात मात्र मान्सूनने कमाल केली. उपलब्ध साठय़ाच्या दुप्पटीहून अधिक साठा या तीन दिवसांत जमा झाला आहे. दहा वर्षांच्या सरासरीएवढी कामगिरी पावसाने केली आहे. शहराला वर्षभरासाठी साडेतेरा लाख दशलक्ष लिटरची आवश्यकता असते. यावर्षी मध्य वैतरणा तलाव पूर्ण क्षमतेने उपलब्ध झाल्याने तलावांची एकूण क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर झाली आहे.
कृत्रिम पावसाची योजना बासनात..
पाऊस कमी पडल्यास तलावांमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आखण्यात आलेली योजना आता गुंडाळण्यात येण्याची शक्यता आहे. यासाठी १५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. २०१२ मध्येही कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची तयारी करण्यात आली होती. मात्र तेव्हाही पावसाने उशिरा दमदार सुरुवात केली होती.
वाढता पाणीसाठा

३१ जुलैचा पाणीसाठा