दोन दिवसांत पाणीसाठय़ात ५१ हजार दशलक्ष लिटरहून अधिक वाढ

मुंबई : मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सात तलावांमध्ये गेले दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असून तलावातील पाणीसाठय़ात सुमारे ५१ हजार ६८५ दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. पावसाने दडी मारल्याने जूनमध्ये खालावलेली जलपातळी वाढू लागली आहे.

मुंबईकरांना अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या तलावांमधून दर दिवशी तीन हजार ८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. या तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी सुमारे १४.५० लाख लिटर जलसाठा जमा झाल्यास मुंबईकरांना वर्षभर पुरेसा पाणीपुरवठा करणे पालिकेला शक्य होते. अन्यथा पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ मुंबईकरांवर ओढवते.

यंदा जूनमध्ये अधूनमधून हजेरी लावून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे तलावांतील जलसाठा रोडावू लागला होता. मात्र गेल्या दोन दिवसांमध्ये पावसाने तलावक्षेत्रात दमदार हजेरी लावली असून तलावांमध्ये सुमारे ५१ हजार ६८५ दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. त्यामुळे ६ जुलै रोजी सकाळी ६ वाजता तलावांतील जलसाठा एक लाख ६० हजार ६९२ दशलक्ष लिटरवर पोहोचला. भातसामध्ये ३८ हजार २०८ दशलक्ष लिटर, तर विहारमध्ये तीन हजार ८०७ दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. तानसामधील जलसाठय़ात दोन हजार २२१ दशलक्ष लिटर, तुळशीमध्ये दोन हजार ३८ दशलक्ष लिटर, मध्य वैतरणामध्ये एक हजार ९३० दशलक्ष लिटर पाण्याची वाढ झाली आहे.

४ जुलै रोजी सकाळी ६ वाजता तलावांमधील जलसाठा एक लाख ९ हजार ७ दशलक्ष लिटर होता. गेल्या वर्षी याच दिवशी तलावांमध्ये २ लाख १६ हजार ५२२ दशलक्ष लिटर इतका जलसाठा तलावात होता.

तलावक्षेत्रांत पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

तलाव                     ५ जुलै             आतापर्यंतचा पाऊस

अप्पर वैतरणा        ८२                       ४१३

मोडकसागर           ५४                       ३९७

तानसा                   ३९                       ३७३

मध्य वैतरणा        ६२                       ५०९

भातसा                  ७५                       ५१५

विहार                   १३१                     ७९३

तुळशी                  १७५                     ९९४

६ जुलैची पाणीपातळी (दशलक्ष लिटरमध्ये)

वर्ष               जलसाठा

२०२०             १,६०,६९२

२०१९            २,१६,५२२

२०१८            ३,९९,००१