धारावीमधील धोबीघाट आणि मुख्याध्यापक नाल्यांवरील प्रार्थनास्थळांमुळे आसपासच्या वस्त्या जलमय झाल्या होत्या. धोबीघाट नाल्यातील पाण्याचा प्रवाह रोखला गेल्यामुळे शीवमधील काही रस्ते पाण्याखाली गेले आणि त्याचा फटका मुंबईकरांना बसला. नाल्यातील पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने व्हावा यासाठी पालिकेने सोमवारी या मंदिरांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
धारावी, शीव, माटुंगा परिसरातील पावसाचे पाणी धोबीघाट आणि मुख्याध्यापक नाल्याला मिळते. धोबीघाट नाल्यावर महाकाली मातेचे, तर मुख्याध्यापक नाल्यावर मरीआई मातेचे मंदिर आहे. या मंदिरांमुळे दोन्ही नाल्यांचे प्रवाह रोखले गेले आहेत. नाल्याच्या प्रवाहातील अडथळा बनलेली ही मंदिरे स्थलांतरित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मात्र काही संघटनांनी त्यास विरोध केला आणि कारवाईसाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्यांना माघारी फिरावे लागले. शनिवारी पहाटेपासून मुंबईत हजेरी लावणाऱ्या पहिल्याच पावसाने हे दोन्ही नाले तुडुंब भरले. मंदिरांच्या अडसरामुळे पाण्याचा प्रवाह पुढे जाण्यास जागा मिळत नव्हती. धोबीघाट नाला पावसाच्या पाण्याने भरल्यामुळे शीवमधील रोड नं. २४, मुख्याध्यापक भवन मार्गपर्यंतचा भाग जलमय झाला, तर मुख्याध्यापक नाल्यामुळे सोशल नगरमध्ये पाणीच पाणी झाले.
दोन्ही नाल्यांमध्ये पावसाचे पाणी साचू लागताच पालिका अधिकाऱ्यांनी धारावीमध्ये धाव घेतली.