19 February 2019

News Flash

२२५ ठिकाणी यंदाही ‘तुंबई’?

२०८ सखल जागांवर पाणी जास्त काळ तुंबून राहू नये यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत.

पावसाळय़ापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याचा निर्धार पालिकेने केला असला तरी, वांद्रे येथील तुंबलेला नाला पाहिल्यानंतर हे शिवधनुष्य यंदा तरी पेलता येईल का, याबाबत साशंकता आहे.  (छायाचित्र: दिलीप कागडा)

हजारो कोटींच्या खर्चानंतरही पावसाळय़ात पाणी साचण्याची भीती

नालेसफाई, ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्प, पाणी उपसण्याचे पंप यावर हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करूनही या वर्षीही शहरातील २२५ ठिकाणी पाणी तुंबण्याची भीती पालिकेनेच व्यक्त केली आहे. मेट्रोच्या कामातून निर्माण झालेला राडारोडा नाल्यावर पडल्याने वांद्रे येथे आलेली पूरस्थिती पाहता महानगरपालिकेने या वेळी शहरातील १७ ठिकाणांची जबाबदारी मेट्रो कॉर्पोरेशनकडे सोपवली आहे. उर्वरित २०८ सखल जागांवर पाणी जास्त काळ तुंबून राहू नये यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत.

सखल भागातील पाणी उपसून काढण्यासाठी ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्पाअंतर्गत गेल्या आठ वर्षांत सहा जल उदंचन केंद्रे बांधण्यात आली असून त्यासाठी महानगरपालिकेने प्रत्येकी दीडशे ते दोनशे कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र तरीही शहरातील सखल भागात पाणी तुंबण्याची शक्यता पालिकेला वाटत आहे. या वेळी शहरातील २२५ ठिकाणी पाणी तुंबणार असल्याचे पालिकेच्या पाहणीत दिसून आले असून त्यातील ६० ठिकाणी पाणी तुंबण्याची समस्या अधिक गंभीर असेल. यात दरवर्षीप्रमाणे हिंदमाता, भायखळा, दादर, माहीम, माटुंगा, शीव, कुर्ला, अंधेरी, मालाड, घाटकोपर या भागांचा समावेश आहे. या ठिकाणी पालिकेचे अधिकारी जास्त लक्ष देणार आहेत. तसेच पाणी उपसण्यासाठी पंपही पुरवले जाणार आहेत.

शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांच्या राडारोडय़ामुळेही गेल्या वर्षी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले होते. गतवर्षी २९ ऑगस्ट रोजी वांद्रे येथील पाण्याचा निचरा न झाल्याने अवघी मुंबई जलमय झाली होती. वांद्रे येथील नाल्याच्या तोंडावर कंत्राटदाराने मेट्रोचे डेब्रिज टाकल्यामुळे पाणी तुंबून राहिले असा आरोप पालिकेने केला होता. या अनुभवावरून शहाणे होत महानगरपालिकेने या वर्षी शहरातील १७ ठिकाणांची जबाबदारी मेट्रोवर सोपवली आहे. यात मुख्यत्वे पश्चिम उपनगरात काम सुरू असलेल्या भूमिगत मेट्रोच्या स्थानकांचा समावेश आहे. त्या ठिकाणी असलेल्या पर्जन्यजलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या अन्यत्र हलवताना पाण्याचा प्रवाह अडला जाणार नाही, याची काळजी संबंधित संस्थांनी घेणे आवश्यक आहे, असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार या १७ जागांची जबाबदारी मेट्रो कॉर्पोरेशनकडे सोपवण्यात आली आहे.

पावसाळी सुसज्जतेचा भाग म्हणून महानगरपालिकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत. पाणी जाण्याचे मार्ग खुले ठेवण्यात आले असून पाणी साठल्यास पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासंबंधीच्या सूचना संबंधित कंत्राटदारांनाही देण्यात आल्या आहेत. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी घटनास्थळी पाहणी केली आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली

निम्म्या नालेसफाईचा दावा

नालेसफाईसाठी महापालिकेने १४० कोटी रुपयांची कंत्राटे दिली आहेत.  आतापर्यंत ५० टक्के नालेसफाई पूर्ण झाली असल्याचे पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रमुख विद्याधर खंडकर यांनी सांगितले. संपूर्ण शहरात २६० किलोमीटर लांबीचे मोठे नाले असून ४६५ किलोमीटरचे लहान नाले आहेत. पावसाळ्याआधी या नाल्यांमध्ये साडेपाच लाख टन गाळ काढला जाणार आहे.

पाणी उपसण्यासाठी ५५ कोटी रुपये

सखल भागातील पाणी उपसून गटारात टाकण्यासाठी या वेळी २७९ संच भाडेतत्त्वावर लावण्यात येणार आहेत. परळ, वांद्रे, मालाड, कुर्ला, घाटकोपर, चेंबूर, भांडुप, मुलुंड या उपनगरात पाणी साचण्याचे प्रमाण अधिक असल्याने तेथे अधिक संच लावले जातील. हे संच २५ मे ते १५ ऑक्टोबर या कालावधीत सुरू राहणार असून दोन वर्षांच्या कंत्राटासाठी पालिकेने ५५ कोटी खर्च केले आहेत.

First Published on May 5, 2018 2:43 am

Web Title: water logging issue in mumbai bmc 2