News Flash

शहरात पाणी तुंबले नव्हते, तर साठले!

शिवसेना कोणतीही जबाबदारी झटकत नाही. ‘मन की बात’ बोलणारे आज ‘धन की बात’ बोलू लागले आहेत.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा भाजपला टोला

शहरात पाणी तुंबले नव्हते तर साठले होते, असा दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शुक्रवारी केला. सकाळी झालेल्या पावसात शहरातील काही भागात काही वेळ पाणी साठले होते. पाणी तुंबले होते, असे म्हणता येणार नाही, असे महापौरांनी सांगितले. त्याच वेळी कोणाचेही नाव न घेता महापौरांनी भाजपला टोला लगावला.

शिवसेना कोणतीही जबाबदारी झटकत नाही. ‘मन की बात’ बोलणारे आज ‘धन की बात’ बोलू लागले आहेत. शिवसेना अच्छे दिनचे दिवास्वप्न रंगवत नाही तर वास्तव चित्र समोर ठेवून काम करते. देशात विषमता, जातीयता, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत. हे सोडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी ती पार पाडून देशातील नागरिकांना चांगले दिवस दाखवावेत. पालिकेला तीचे काम करू द्यावे, असे महापौर महाडेश्वर यांनी सांगितले. महापालिकेच्या कारभारात मुख्यमंत्री हस्तक्षेप करत असल्याच्या आरोपावरून शिवसेना व भाजपमध्ये पुन्हा वाद रंगला आहे. सत्ताधारी मुंबईत योग्य प्रकारे काम करत नसल्याने मुख्यमंत्र्यांना लक्ष घालावे लागत आहे, असा टोला भाजपकडून लगावला गेल्याने महापौरांनी शुक्रवारी कोणाचेही नाव न घेता त्याला प्रत्युत्तर दिले.

स्थानिकांनी सहकार्य करावे

महापालिकेकडून शहरातील प्रत्येक मॅनहोल तसेच गटारावरील झाकणे लावली जातात. पावसाळ्यात कोणतेही मॅनहोल उघडे राहू नये यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र स्थानिकांकडून काही वेळा झाकणे बाजूला केली जातात. चिता कॅम्पमध्ये अडीच वर्षांच्या मुलाच्या दुर्दैवी मृत्यूसारख्या घटना टाळायच्या असल्यास मुंबईकरांनी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौरांनी केले.

मॅनहोलचे झाकण उघडल्याबाबत तक्रार

माटुंगा येथील पाच उद्यान परिसराजवळील एका मॅनहोलचे झाकण उघडे असल्याचे आढळल्याने माटुंगा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार केली जात असल्याचे एफ उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त केशव उबाळे यांनी सांगितले. किमान दोन व्यक्तींनी विशिष्ट प्रकारचा ‘आकडा’ वापरल्यानंतर हे झाकण उघडता येते. तसेच कामाच्या आवश्यकतेनुसार महापालिका कर्मचारीच हे झाकण उघडू शकतात. मात्र हे झाकण उघडल्यावर त्याच्या जवळ फलक वा झेंडा लावणे तसेच काम होईपर्यंत कर्मचाऱ्यांनी तिथे उभे राहणे बंधनकारक असते. तुंबलेले पाणी कमी होण्यासाठी अनेकदा स्थानिकांकडून हे झाकण उघडले जाते. गेल्या वर्षी अशा उघडलेल्या झाकणामुळे डॉ. अमरापूरकर यांचा वाहून मृत्यू झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 2:10 am

Web Title: water logging mayor vishwanath mahadeshwar bjp
Next Stories
1 प्लास्टिक बंदीसाठी महापालिका तयार
2 कारागृहातून माहितीच्या अधिकारात अर्ज
3 घटना स्थळ : गुन्हेगारांचे आश्रयस्थान
Just Now!
X