पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिका २७२ पंप भाडेतत्त्वावर घेणार
गेल्या वर्षी मुंबईमध्ये पाणी साचणाऱ्या ठिकाणांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे यंदा त्या परिसरातील साचलेले पाणी उपसण्यासाठी पंप बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिकेने २७२ पंप भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला असून पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये प्रत्येकी दोन अतिरिक्त पंप ठेवण्यात येणार आहेत. पूरस्थिती झटपट निवारण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील कर्मचारी पूर्णवेळ सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
पावसाळ्यात जलमय होणाऱ्या सखल भागातील पाण्याचा उपसा करण्यासाठी पालिकेकडून पंप बसविले जातात. गेल्या वर्षी मुंबईत ठिकठिकाणी २४४ पंप बसविण्यात आले होते. मात्र १८ ठिकाणी पंपांचा वापरच झाला नाही. त्यामुळे यंदा आपापल्या विभागातील सखल भागांचा आढावा घेण्याचे आदेश विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांना देण्यात आले होते. साहाय्यक आयुक्तांकडून उपलब्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार मुंबईत पाणी साचण्याच्या ठिकाणांमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पालिकेने यंदा २७२ पंप भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी २४ पंप पालिकेच्या १२ विभाग कार्यालयांमध्ये (प्रत्येकी दोन) ठेवण्यात येणार असून गरजेनुसार ते जलमय होणाऱ्या परिसरात उपलब्ध करण्यात येतील. एखाद्या विभागातील पंप नादुस्त झाल्यास तात्काळ विभाग कार्यालयातील पंप तेथे नेण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत दिली.
सखल भागांमध्ये साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याची जबाबदारी पालिकेच्या विभाग कार्यालयांवर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील प्रत्येकी दोन कर्मचारी विभाग कार्यालयांमध्ये सज्ज ठेवण्यात येणार आहेत, असेही संजय देशमुख यांनी सांगितले. पंप बंद पडतात, डिझेल संपते, अशा वेळी मुसळधार पाऊस पडल्यानंतर परिसरात मोठय़ा प्रमाणावर पाणी साचते आणि त्याचा फटका जनतेला बसतो. त्यामुळे कंत्राटदारांवर कोणती कारवाई केली, असा मुद्दा नगरसेवकांनी या वेळी उपस्थित केला. त्यावर बोलताना संजय देशमुख म्हणाले की, गेल्या वर्षी पंप बंद पडल्यामुळे मुंबई जलमय झाली. या प्रकरणी संबंधित ठेकेदारांकडून १ कोटी ९३ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.