22 September 2020

News Flash

मुंबईच्या समुद्रात दररोज १०४८ दशलक्ष लिटर सांडपाणी!

महापालिकेवर महालेखापरीक्षकांचे कडक ताशेरे

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

महापालिकेवर महालेखापरीक्षकांचे कडक ताशेरे

शिवसेनेचा ‘करून दाखविल्याचा’ दावा किती पोकळ आहे याचा पोलखोलच महालेखापरीक्षांच्या अहवालाने झाला असून भाजपच्या झोपाळू रखवालदारांचेही पालिकेच्या कारभारावर किती व कसे लक्ष आहे तेही या निमित्ताने उघडकीस आले आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात दररोज तयार होणाऱ्या २,१४६ दशलक्ष लिटर सांडपाण्यापैकी जवळपास निम्म्या, म्हणजे १०४८ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते समुद्रात सोडले जाते. तसेच मलनि:सारण प्रकल्पाच्या योजना राबवताना कंत्राटदारांना कोटय़वधी रुपये जादा दिले गेले आणि सल्लागारांवरही कोटय़वधी रुपयांची खैरात करूनही ठोस व कालबद्ध योजना राबवणे पालिकेला शक्य झाले नसल्याचे कॅगच्या अहवालातून दिसून आले.

महापालिकेच्या मलनि:सारण विभागामध्ये मलनि:सारण प्रकल्प, प्रचलन व विल्हेवाट असे तीन विभाग जबाबदार असून २०१६ जुलैच्या स्थितीनुसार मुंबईत दररोज तयार होणाऱ्या २१४६ दशलक्ष लिटर सांडपाण्यापैकी निम्मे सांडपाणी प्रक्रिया न करताच समुद्रात सोडण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. पालिकेने २००२ साली या तिन्ही विभागांसाठी सन २०२५ पर्यंत पाच टप्प्यांतील ५५७० कोटी रुपयांचा बृहत आराखडा तयार केला होता. याअंतर्गत नवीन वाहिन्या टाकणे तसेच अस्तित्वात असलेल्या वाहिन्या मोठय़ा करण्यापासून अनेक कामांचा अंतर्भाव आहे. यात ११५.६७ किलोमीटर लांबीच्या वाहिन्या मोठय़ा करण्याची १०५ कामे निवडण्यात आली. त्यापैकी २०१६ जुलैपर्यंत अवघी ४४ कामे पूर्ण झाली असून त्यांची लांबी ४९.८१ किमी एवढी आहे. तसेच मुंबईतील झोपडपट्टय़ांच्या ३५.५२ चौरस कि.मी क्षेत्रापैकी ८.१९ चौरस कि.मी. क्षेत्रामध्येच नवीन मलनि:सारण वाहिन्याचे जाळे टाकण्यात आले आहे तर मलनि:सारणाची व्यवस्था नसलेल्या झोपडपट्टीतील ३०.३ चौ. कि.मी. संदर्भात मलनि:सारण वाहिन्या टाकण्यासाठी पालिका कोणताही सर्वसमावेशक आराखडा तयार करू शकली नाही. यासाठी करण्यात आलेल्या खर्चाचा आढावा घेतला असता कंत्राटदारांना तब्बल ४४.३६ कोटी रुपये जास्त देण्यात आले आहेत. तसेच सूक्ष्म भुयारी कामांवर १२४ कोटी रुपये खर्च करूनही मलनि:सारण प्रकल्प विभाग ही भुयारी योजना कार्यान्वित करू शकला नाही.

बृहत आराखडय़ात प्रस्तावित केलेल्या एकूण ३६३ कि.मी. मलनि:सारण वाहिन्यांपैकी केवळ ६२ कि.मी.च्या जुन्या मलनि:सारण वाहिन्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. पुनर्वसनाच्या कामात चुकीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आल्यामुळे कंत्राटदाराला २२ कोटी रुपये अतिरिक्त देण्यात आले. १२५६ कि.मी.च्या जुन्या मलनि:सारण वाहिन्यांची अवस्था तपासण्याच्या कामावर ८९ कोटी २५ लाख रुपये खर्च झाले असले तरी या वाहिन्यांच्या विस्ताराच्या पुनर्वसनासाठी कोणताच कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आलेला नाही. सांडपाणी प्रकल्प व प्रकियेच्या कामाच्या सल्ल्यापोटी १४१.७८ कोटी रुपये खर्च होऊनही प्रकिया करून समुद्रात व खाडीत पाणी सोडण्याच्या परिस्थितीत काहीच बदल झालेला नाही, असेही कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हागणदारीमुक्ती कागदावरच

मार्च २०१६ अखेरीस मुंबईत एकूण २०,१९६  शौचालय सिटस्चा तुटवडा होता. त्यापैकी पालिकेने केवळ ५,७९७ शौचालय सिटस् बांधल्या. उपलब्ध असलेल्या ८५९४ शौचालय गृहांपैकी केवळ २,४७६ शौचालयेच मलनि:सारण वाहिन्यांना जोडली गेली आहेत. त्यामुळे उघडय़ावरील हागणदारी कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य झाले नसल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2017 1:39 am

Web Title: water pollution in mumbai sea
Next Stories
1 शस्त्रांची कमतरता राहिल्यास गंभीर समस्यांची शक्यता!
2 विक्रीकर विभागाचे वाभाडे
3 परिवहन विभागात गोंधळच गोंधळ
Just Now!
X