ठाणे आणि नाशिक क्षेत्रात शुक्रवारी रात्री पडलेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातील साठय़ात ४९ हजार दशलक्ष लिटरची वाढ झाली आहे. हा वाढीव पाणीसाठा शहराची १८ ते २० दिवसांची तहान भागवू शकेल.

भातसा तसेच वैतरणा या दोन्ही तलावक्षेत्रात शुक्रवारी पाऊस पडला. त्यामुळे तलावातील एकूण जलसाठा १० लाख ४३ हजार दशलक्ष लिटरवर पोहोचला. गेल्या वर्षी या तारखेला तलावात १४ लाख ३० हजार दशलक्ष पाणीसाठा होता. शहराला वर्षभराची गरज १४ लाख दशलक्ष लिटरची आहे. त्यामुळे पाणीसाठय़ातील वाढ पुरेशी नाही. दरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरींची शक्यता वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आल्याने तलावक्षेत्रातील पाण्यात वाढ होण्याची आशा आहे.

तलाव भरला तरी ..

शनिवारी सकाळी सहा वाजेपर्यंत १३९ मिलीमीटर पाऊस झाल्याने मध्य वैतरणा तलावातील पाणी काठोकाठ भरले. मात्र मध्य वैतरणा धरणाचे दरवाजे उघडून त्यातील पाणी मोडक सागर धरणात सोडण्यात आले. त्यामुळे तांत्रिकदृष्टय़ा हा तलाव भरला नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. तलावाची पाणी भरण्याची सर्वोच्च पातळी २८५ मीटर असून सध्या २८४.२५ पर्यंत पाण्याची पातळी आहे.

तलावाची पाणी साठवण्याची क्षमता १ लाख ९५ हजार दशलक्ष लिटर असून तलावात आजमितीला १ लाख ९० हजार दशलक्ष पाणीसाठा आहे.