पुण्यातील चार मुख्य धरणांतील १० टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्याच्या राज्य जलस्रोत नियंत्रण प्राधिकरणाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने आधीच नकार दिला आहे; मात्र धरणात पाणी सोडण्याचा निर्णय प्राधिकरणाच्या ज्या सदस्यांनी घेतला. त्यातील एका सदस्याची शेतजमीन या धरणाच्या परिसरात असल्याचे बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळेस उघड झाले. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने या अधिकाऱ्याला तात्काळ राजीनामा देण्याचा वा कारवाईला सामोरे जाण्याचा पर्याय ठेवला. त्यामुळे या सदस्याने सायंकाळीच प्रतिज्ञापत्राद्वारे आपल्या पदाचा राजीनामा न्यायालयात सादर केला. या चार धरणांतील पाणी उजनी धरणात सोडण्याच्या प्राधिकरणाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे.