|| विनायक परब

इथे महाल वाटावा, अशा रचना आहेत. प्रतिमा आहेत, घरेही आहेत, स्तंभांच्या रचना आहेत आणि पाण्याच्या टाक्याही आहेत. दगडामध्ये कोरलेले हे अख्खेच्या अख्खे शहरच आहे. इथे काही हजार भिक्खू राहात असावेत.. पोर्तुगीज प्रवासी दोन जोओ दी केस्ट्रो याने १५३९ साली बोरिवली येथील कान्हेरीच्या बौद्ध लेणींना दिलेल्या भेटीप्रसंगी केलेली नोंद!

यातील पाण्याच्या टाक्या किंवा पाणपोढी यांना एक वेगळे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या दिवस पावसाळ्याचे आहेत. गेली कित्येक वर्षे भूजलपातळी जगभरात खालावते आहे. भविष्यातील यादवी ही पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे होईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागले, त्यानंतर आता जलयुक्त शिवार हा प्रकल्प जोरात आहे. सारा भर आहे तो पर्जन्यजलसंचय अर्थात रेनवॉटर हार्वेस्टिंगवर. आपल्यापैकी अनेकांना असे वाटते आहे की, ही योजना विसाव्या शतकाची देणं आहे. मात्र वस्तुस्थिती अशी की कान्हेरीच्या डोंगरावर आलात तर इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील अप्रतिम रचना असलेली पर्जन्यजलसंचय योजना आजही इथे पाहता येते.

येथील पर्जन्यजलसंचय योजना दोन ठळक भागांमध्ये पाहायला मिळते. कान्हेरीच्या डोंगरावर अगदी वरच्या बाजूस पाण्याच्या तीन मोठय़ा टाक्या आहेत. तर खालच्या बाजूस असलेल्या लेणींच्या त्रिस्तरीय रचनेत संपूर्ण डोंगरावर आखीवरेखीव पन्हाळी कोरलेली दिसतात. खाली असलेल्या लेणींच्या बाजूस पाण्याच्या टाक्या अर्थात पाणपोढी आहेत. ही पन्हाळी पावसाचे पाणी घेऊन या पाणपोढीत रिती होतात. यातील अनेक पोढी या खाली असलेल्या दुसऱ्या पोढींशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे वरची पोढी भरली की, अतिरिक्त पाणी दुसऱ्या पन्हाळीच्या मार्गे खाली असलेल्या पाणपोढीमध्ये येते. अशाप्रकारे पाणपोढी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. लेणी क्रमांक दोनच्या समोर असलेल्या पाणपोढी या सर्वात खालच्या स्तरावर आहेत. त्यातील शेवटची पोढी ही प्राण्यांना पाणी पिण्यासाठी असावी. या सर्व पाणपोढींच्या बाजूस त्या खोदण्यासाठी दिलेल्या दानकर्त्यांचे नाव कोरण्यात आले आहे. कुणी कल्याण येथील तर कुणी सोपाऱ्याचा व्यापारीश्रेष्ठी होता, असे शिलालेखांवरून लक्षात येते. जवळपास सर्व पाणपोढींवर लाकडी झाकणे असावीत असे त्यांच्या रचनांवरून लक्षात येते.

इथले महत्त्वाचे आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन म्हणजे दुसऱ्या शतकात बांधलेले धरण. लेणी क्रमांक ४१ च्या समोरच्या बाजूस या धरणाच्या दोन भिंती मध्यभागी तुटलेल्या अवस्थेत आजही उभ्या आहेत. त्यांच्या अजस्रपणाचा विचार करत असतानाच दुसऱ्या शतकात धरणाची कल्पना सुचावी, याचे कौतुकही वाटते. धरणाच्या भिंतींच्या खालच्या बाजूस असलेला कातळ कापून पाणी पुढे जाण्यासाठी वाट करण्यात आली होती. ही वाट लाकडी दरवाजाने उघडबंद करण्याची सोय होती. या धरणाच्या भिंतींच्या बांधकामासाठी त्यावेळेस लोखंड वितळवून वापरण्यात आले होते. त्याचे पुरावेही इथेच सापडतात. हाच दहिसर नदीचा उगमही होय. कान्हेरीतील शिलालेखांमध्ये असलेल्या नोंदींवरून असे लक्षात येते की, जवळपास बरीच शेतजमीन असावी, त्या शेतीसाठी या पाण्याचा वापर केला जात असावा. धरणामुळे मागच्या बाजूस म्हणजे पूर्वेकडे मोठा तलाव तयार झाला होता. याची एक बाजू आताच्या तुळशी तलावाला जाऊन मिळत होती, असे येथील भूरचनाशास्त्रावरून लक्षात येते. धरणाच्या बांधकामासंदर्भातील शिलालेख बाजूलाच लेणी क्रमांक ४१ शेजारी पाहायला मिळतो. सोपाऱ्याचा व्यापारी श्रेष्ठी पूणक याने या बांधकामासाठी दान दिल्याचा उल्लेख त्यात आहे. धरणाच्या बांधकामासाठी लागलेले भले मोठे दगड लेणी क्रमांक ५०च्या बाजूलाच कातळातून कातून खालच्या बाजूस आणण्यात आले आहेत.

या धरणाकडून मागच्या बाजूस असलेल्या कान्हेरीच्या दरीत उतरल्यानंतर पुढे वाटेत गोमुख नावाचे ठिकाण लागते. पूर्वी इथे एका बाबाने आपला आश्रम थाटला होता. १९९५ सालच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता ती जागा रिकामी आहे. इथे एक जिवंत झरा आजही वाहात असतो.

दहिसर नदीचे पाणी धरणातून सुटल्यानंतर पुढे त्याला दोन ठिकाणी लाकडी बांध होते, याचे पुरावेही सापडतात. इथे पाणी अडवून त्याचा वापर कपडे धुण्यासाठी किंवा अंघोळीसाठी होत असावा. त्यानंतर पुढचा लाकडी बांध सरकवून स्वच्छ पाणी सोडले जात होते. ही रचना केवळ कौतुकास्पद अशीच आहे. आता मात्र या बांधाची खूण असलेले पुरावे भारतीय पुरातत्त्व खात्याने सिमेंटीकरणाच्या माध्यमातून केलेल्या संवर्धनाखाली लुप्त झाले आहेत. एएसआयने नदी पात्रातच आता पर्यटकांसाठी सिमेंटची मार्गिका तयार केली आहे.

इथली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जलशुद्धीकरण यंत्र. लेणी क्रमांक ३४च्या दिशेने जाताना वाटेतच आपल्याला एक चौकोनी खोलगट आकार आणि बाजूला दोन खोलगट गोलाकार पाहायला मिळतात. हे दुसऱ्या तिसऱ्या शतकातील जलुद्धीकरण यंत्र होय. कान्हेरीची ही जलसंचय योजना आणि जलनियोजन केवळ थक्क करायला लावणारे असेच आहे!

vinayak.parab@expressindia.com

@vinayakparab