जून ते सप्टेंबरदरम्यान अधूनमधून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील ९८ सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे निदर्शनास आले असून पुढील वर्षांमध्ये हे सखल भाग जलमय होऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शनिवारी पालिका अधिकाऱ्यांच्या मासिक बैठकीत दिले. काही सखल भागांची सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी करून तोडगा काढण्याची सूचनाही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केली.

यंदा पावसाळ्यामध्ये मुंबईत ९८ ठिकाणी पाणी साचल्याचे निदर्शनास आले. त्यांपैकी ३७ ठिकाणे शहरात, ३४ ठिकाणे पूर्व उपनगरात, तर २७ ठिकाणे पश्चिम उपनगरांमध्ये आहेत. या सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे आसपास राहणारे रहिवाशी, पादचारी आणि वाहतुकीला फटका बसला. पुढील वर्षी पावसाळ्यात या ९८ सखल भागांमध्ये पाणी साचू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश अजोय मेहता यांनी परिमंडळांतील पालिका उपायुक्तांना दिले. सध्या २६ सखल भागांमध्ये उपाययोजना करण्याचे काम प्रगतिपथावर असून २६ पैकी ११ सखल भाग शहरात, सहा पूर्व उपनगरांत, तर नऊ पश्चिम उपनगरांत आहेत. उर्वरित ७२ पैकी २७ ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शहरातील सात, पूर्व उपनगरांतील नऊ आणि पश्चिम उपनगरांतील ११ सखल भागांचा त्यांत समावेश आहे. पालिकेच्या विविध खात्यांतील अधिकाऱ्यांना ४५ सखल भागांची संयुक्त पाहणी करण्याचे, तसेच संयुक्त बैठक आयोजित करून योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

मुंबईतील ४५ पैकी १२ सखल भाग सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, रेल्वे आदी यंत्रणांशी संबंधित आहेत. त्यामुळे या यंत्रणांच्या अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त पाहणी करून सखल भागांमध्ये पाणी साचू नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश अजोय मेहता यांनी दिले. संबंधित यंत्रणांमधील अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त पाहणी दौरा आणि बैठका पार पडल्यानंतर कृती आराखडा तयार करून तो डिसेंबरमध्ये होणाऱ्या परिमंडळीय उपायुक्तांच्या बैठकीत सादर करावा, असेही अजोय मेहता यांनी स्पष्ट केले. त्यामुळे याबाबतची पाहणी, बैठका आणि आराखडा तयार करण्याचे काम दोन आठवडय़ांमध्ये करावे लागणार आहे.