|| प्रसाद रावकर

पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे बळकट करण्यावर प्रस्तावित निधीहून अधिक रक्कम खर्च

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईतील सखल भागांत पाणी तुंबणार नाही, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. शहरातील पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे सक्षम करणे, नदी-नाल्यांचे रुंदीकरण-खोलीकरण करणे आदी कामांसाठी प्रस्तावित निधीहून अधिक रक्कम खर्च झाली आहे.

२०१८-१९ च्या अर्थसंकल्पात या खात्यासाठी ५७६.२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यातून हिंदमाता, मुख्याध्यापक नाला यासह विविध नाल्यांना जोडण्यात येणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे बळकट करण्यावर पालिकेने भर दिला आहे. पाणी साचू नये यासाठी मोठी कामे हाती घेतली आहेत. तसेच कार्यान्वित केलेल्या उदंचन केंद्रांवरही पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे चालू वर्षांतील या विभागाचा खर्च ८२९.६८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या खात्यासाठी चालू वर्षांच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित निधीच्या तुलनेत तब्बल ४३.९७ टक्के अधिक निधी खर्ची पडला आहे.

मुंबईमध्ये २६ जुलै २००५ रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला होता. मिठीसह अन्य सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आणि मुंबईतील सखल भाग जलमय झाले. या अस्मानी संकटानंतर पालिकेने ब्रिमस्टोवॅड प्रकल्प हाती घेतला. नदी-नाल्यांची रुंदी, खोली वाढविणे, संरक्षक भिंती उभारून नदी-नाले सुरक्षित करणे, सखल भागात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी उदंचन केंद्र बांधणे, पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे उभारणे आदी विविध कामांचा या प्रकल्पामध्ये समावेश होता. मात्र आजतागायत पालिकेला ब्रिमस्टोवॅड प्रकल्पातील कामे पूर्ण करता आलेली नाहीत. गेल्या अनेक वर्षांमध्ये या कामांसाठी अर्थसंकल्पात बक्कळ निधीची तरतूद करण्यात आली. मात्र कामांना गती मिळत नसल्यामुळे प्रस्तावित निधीपैकी बरीच रक्कम पडून राहात असल्याचे निदर्शनास आले होते. पावसाळ्यात मुंबईत २०१५ मध्ये २६०, २०१६ मध्ये २६४, तर २०१७ मध्ये ३१३ ठिकाणी पाणी साचले होते, तर मुंबईत विविध ठिकाणी विकास कामे सुरू असतानाही २०१८ मध्ये केवळ १७८ ठिकाणे जलमय झाली. ही ठिकाणे जलमुक्त करण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. त्यासाठी पालिकेने मोठय़ा प्रमाणावर कामे हाती घेतली आहेत. सध्या सुरू असलेल्या विविध कामांमुळे १७९ पैकी ६० ठिकाणांना जलमुक्ती मिळेल, असा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षांत (२०१८-१९) पर्जन्य जलवाहिन्या खात्याने सखल भागांवर लक्ष केंद्रित करून पावसाळ्यात त्यांना जलमुक्ती देण्याचा संकल्प सोडला आहे. पालिकेच्या २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात या खात्यासाठी ५७६.२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात केलेल्या तरतुदीच्या तुलनेत विविध कामांवर २५३.४० कोटी रुपये अधिक खर्च झाला असून, तरतुदीच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण ४३.९७ टक्क्यांनी वाढले आहे.

१३०२ कोटी रुपयांची तरतूद

आगामी वर्षांतही पालिका प्रशासनाने मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी पर्यन्य जलवाहिन्या विभागाच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पुढील वर्षांच्या अर्थसंकल्पात या खात्यासाठी तब्बल १,३०२.९८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ४७७.९३ कोटी रुपये महसुली खर्चासाठी, तर ८२५.०५ कोटी रुपये भांडवली खर्चासाठी प्रस्तावित आहेत. भविष्यात पर्जन्य जलवाहिनीविषयक कामांसाठी निधीची कमतरता पडू नये याची काळजी घेत चालू वर्षांच्या तुलनेत अधिक रकमेची तरतूद करण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.