बीयूडीपी जलाशयाला जोडलेली १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी शनिवारी पहाटे ऐरोली जंक्शनजवळ फुटली आणि हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून त्यामुळे शहर आणि पश्चिम उपनगरात १० टक्के, तर पूर्व उपनगरात १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
मुंबई-कक व मुंबई-ककक येथील मोठय़ा जलवाहिनीद्वारे बीयूडीपी जलाशयामध्ये १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जातो. ही जलवाहिनी पूर्व द्रुतगती मार्गावरील ऐरोली जंक्शन येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास फुटली आणि मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा अपव्यय झाला. जलवाहिनी फुटल्याचे समजताच पालिकेच्या जलविभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फुटलेल्या जलवाहिनीच्या झडपा बंद करून वाहणारे पाणी रोखण्यात आले आणि तातडीने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्तीच्या कामामुळे शहर व पश्चिम उपनगरांतील पाणीपुरवठय़ात १० टक्के, तर पूर्व उपनगरात १५ टक्के कपात लागू करण्यात आली आहे.

जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत भांडुप (पूर्व), कांजूरमार्ग (पूर्व), विक्रोळी (पूर्व) आणि मुलुंड (पश्चिम) येथील रेल्वे मार्गापासून ते मुख्य जलवाहिनीपर्यंतच्या भागातील पाणीपुरवठा पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे.