तुळशी, मोडकसागर पाठोपाठ विहारही तुडुंब

ठाणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात झालेल्या मुबलक पावसामुळे मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटण्याची चिन्हे आहेत. मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही तलावक्षेत्रांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा मुक्काम कामय असून सातपैकी तीन तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. तर अन्य तलावातील जलपातळी समाधानकारक आहे. पावसाच्या दमदार हजेरीमुळे सातही तलावांमध्ये नऊ लाख ३४ हजार २११ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला असून आतापर्यंत तलाव ६४.५५ टक्के भरले आहेत.

मुंबईकरांना अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतो. पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे सातपैकी तुळशी, मोडकसागर आणि विहार तलाव भरून वाहू लागले आहेत. तर अप्पर वैतरणा, तानसा, मध्य वैतरणा आणि भातसामध्ये पावसाचा मुक्काम कायम आहे. आतापर्यंत अप्पर वैतरणामध्ये १३१३ मि.मी., मोडकसागरमध्ये १४५९ मि.मी., तानसामध्ये १३२६ मि.मी., मध्य वैतरणामध्ये १२४८ मि.मी., भातसामध्ये १२३९ मि.मी., विहारमध्ये २६८७ मि.मी., तर तुळशीमध्ये २२७९ मि.मी. पाऊस झाला असून अप्पर वैतरणा ५०.९४ टक्के, तानसा ९१.५५ टक्के, मध्य वैतरणा ७४.२० टक्के, तर भातसा ५२.६५ टक्के भरल्याची माहिती पालिकेच्या जल विभागाकडून देण्यात आली. या तलावक्षेत्रांमध्ये पावसाचा मुक्काम कायम आहे. त्यामुळे हे तलावही लवकरच भरतील, असा विश्वास जल विभागातील अभियंत्यांनी व्यक्त केला.

मुंबईकरांना वर्षभर सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा करता यावा यासाठी १ ऑक्टोबर रोजी या सातही तलावांमध्ये एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष पाणीसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. आतापर्यंत तलावांमध्ये नऊ लाख ३४ हजार २११ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध झाले आहे.