पाण्याची नासाडी रोखा; जलसंपदा विभागाचे आदेश
राज्यात तीव्र पाणीटंचाई असल्याने हॉटेल्स आणि रिसॉर्टमधील रेन डान्ससाठी त्याचबरोबर जलतरण तलावांना पाणीपुरवठा करू नये, असे आदेश जलसंपदा विभागाने सर्व महापालिका आयुक्त आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांना दिले आहेत. होळी सणाच्या काळातील पाण्याची नासाडी रोखून पाणीबचतीसाठी विविध उपाययोजना व जनजागृती करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने दिल्या आहेत.
मुंबई, पुण्यासह राज्यातील शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. मराठवाडा आणि दुष्काळग्रस्त गावांमध्ये भीषण परिस्थिती आहे, तरीही हॉटेल्स, रिसॉर्ट येथे रेन डान्सचे कार्यक्रम होत असतात आणि होळीनिमित्त व उन्हाळी सुट्टय़ांमध्ये ते मोठय़ा प्रमाणावर होतात.
राज्यात अनेक भागांमध्ये पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसताना रेन डान्स आणि जलतरण तलावांमध्ये पाण्याची उधळपट्टी योग्य नाही, या भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर होळी-धुळवड आणि रंगपंचमी या सणांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होतो. तो रोखण्यासाठीही आता कठोर पावले टाकली जाणार आहेत. हेच या आदेशातून स्पष्ट होते.

मंत्रालयातही पाण्याचा अपव्यय
राज्यातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता पाणीबचतीसाठी जनजागृती करण्यासाठी शासकीय पातळीवरून पुढाकार घेतला जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जलजागृती’ सप्ताहाचे उद्घाटन बुधवारी केले. पण मंत्रालय, विधान भवन, प्रशासकीय भवन आदी शासकीय इमारतींमध्येही मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. जोडण्यांमध्ये बिघाड, गळके नळ व अन्य कारणांमुळे पाणी फुकट जात आहे.