मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या तलावांनी तळ गाठला असून त्याची झळ पालिका मुख्यालयालाही बसली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पालिका मुख्यालयाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकाराची वाच्चता होऊन गोंधळ उडू नये म्हणून पालिका मुख्यालयाला गुपचूप  टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र जल अभियंत्यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.

गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न पडल्यामुळे मुंबकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये मर्यादीत पाणीसाठी उपलब्ध झाला. त्यामुळे मुंबईकरांच्या पाणीपुरवठय़ात १० टक्के, तर पाण्याच्या वेळेत १५ टक्के कपात करण्यात आली. या कपातीनंतर मुंबईतील टेकडय़ा आणि जलवाहिनीच्या अखेरच्या टप्प्यात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होऊ लागला. त्यामुळे नगरसेवकांनी स्थायी समिती, पालिका सभागृहात आवाज उठविला होता. मात्र वारंवार प्रशासनाने मुंबईत पाणी टंचाई नसल्याचे नमूद करीत हात झटकले होते.

गेल्या साधारण तीन महिन्यांपासून पालिका मुख्यालयालाही पाणी टंचाईच्या झळा बसल्या आहेत. अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे तीन महिन्यांपासून पालिका मुख्यालयाला टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ ओढवली आहे. पालिका मुख्यालयात महापौर, आयुक्त, वैधानिक समित्यांचे अध्यक्षांची दालने, तसेच पक्ष कार्यालये आहेत. मोठा कर्मचारीवृंद आहे. त्यामुळे पालिका मुख्यालयात मोठय़ा प्रमाणावर पाण्याची गरज भासते. ही गरज भागविण्यासाठी मुख्यालयाला टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागले आहे. प्रशासनाने याबाबत कोणतीही कल्पना न दिल्यामुळे नगरसेवकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे.

पालिका मुख्यालयामध्ये ५० हजार लिटरच्या दोन टाक्यांमध्ये पाणी साठविले जाते आणि त्याचा नियमित वापर केला जातो. मात्र अधूनमधून कमी पुरवठा झाल्यास पालिकेचेच पिण्याचे पाणी टँकरने मागविले जाते आणि टाक्यांमध्ये भरले जाते, असे पालिका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

दरम्यान, पालिका मुख्यालयाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत नाही, असे जलअभियंता अशोककुमार तवाडिया यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.