|| जयेश शिरसाट

अपुरा पाणीपुरवठा, शौचालयांची वानवा आणि अस्वच्छता:- कोणतीही निवडणूक असो, इथला पाणी प्रश्न सोडवणार, हे वचन घाटकोपर पश्चिमेकडील डोंगराच्या कुशीत वसलेल्या रामजी नगर ते वर्षां नगपर्यंत फिरणाऱ्या प्रत्येक उमेदवाराच्या तोंडावर असते. निवडणुकीनंतर मात्र या वचनाला विस्मृतीची बाधा होते.

Nashik, Girl died falling into bucket,
नाशिक : पाण्याच्या बादलीत पडून बालिकेचा मृत्यू
vasai fort leopard
वसई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत कायम, संध्याकाळ नंतर रोरो सेवा बंद करण्याची सुचना
An increase in the price of silver compared to gold
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ… हे आहे आजचे दर…
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

अपुरा पाणीपुरवठा, शौचालयांची वानवा, त्यामुळे अस्वच्छता, पसरणारी रोगराई, मोफत उपचारांची सोय नाही या दुष्टचक्रातून कोणी सोडवेल, या आशेवर या वस्त्या आहेत. सुरुवातीच्या काळात आश्वासनांच्या गाजरांनी दारिद्रय़रेषेखालील श्रमिकांच्या, खास करून महिलांच्या आशा पल्लवित होत. पाणीप्रश्नाला हात घालणाऱ्या उमेदवारामागे त्या एक होऊन उभ्या राहत; पण फक्त मतांच्या बेगमीसाठी उमेदवार वचने देतात, हे या वस्तीच्या हळूहळू लक्षात येऊ लागले आहे.

डोंगराच्या पायथ्यापासून एकावर एक चढत गेलेली ही वस्ती काही महिन्यांत अगदी शेंडय़ापर्यंत पोहोचेल. घाटकोपर पश्चिम मतदारसंघात येणाऱ्या डोंगरात रामजी नगर, पंचशील नगर, जय मल्हार नगर, गणेश नगर, राहुल नगर, संजय गांधी नगर, वर्षां नगर अशा वस्त्या आहेत. नावे वेगवेगळी असली तरी प्रत्येक वस्तीतल्या प्रत्येक घरात समस्या सारख्याच. कुठल्याही नगरात गेल्यास जेमतेम शंभर फुटांच्या घरांबाहेर ओळीने रचून ठेवलेले प्लॅस्टिकचे कॅन हे चित्र हमखास दिसते.

इथल्या काथोडी पाडा, वर्षां नगर, बम खाना, राम नगर, भटवाडी आणि आनंदगड नाका इथे महापालिकेच्या पाण्याच्या टाक्या आहेत. त्या टाक्यांमधून वस्तीला पाणीपुरवठा होतो. टाक्यांतून पाणीपुरवठय़ासह संरक्षण, देखभाल, डागडुजीची जबाबदारी खासगी संघ किंवा संस्थांकडे आहे. वस्त्यांमध्ये सार्वजनिक नळ आहेत. एका नळावरून ११ घरांना पाणीपुरवठा केला जातो. अनेक भागांमध्ये पाणी मध्यरात्री २ ते पहाटे ४ या वेळेत पाणी सोडले जाते. त्यामुळे दिवसभर घाम गाळून थकलेल्यांना रात्री गाढ झोपण्याचाही हक्क नाही. टाक्या खाली आणि वस्ती वर असल्याने नळाला तासभर पाणी आले तरी ते त्याचा दाब अत्यंत कमी असतो. त्यामुळे प्रत्येक घराची जेमतेम चार ते पाच भांडी भरून होईपर्यंत पाणी जाते. इतक्या पाण्यात जेवण, धुणीभांडी, आंघोळी आणि नैसर्गिक विधींचा हिशोब जमवावा लागतो. या सोयीसाठी घरटी दीडशे ते अडीचशे रुपये मोजावे लागतात. एका संघाकडे लोकवस्तीनुसार पाच ते सहा समूह आहेत. प्रत्येक समूहातून संघाकडे वर्गणी जमा होते. त्याच वर्गणीतून पाणीपट्टी, डागडुजी केली जाते. किती जमा झाले, किती वापरले हा हिशोब विचारण्याचा अधिकार वस्तीला नाही.

पाणीप्रश्नामुळे सणासुदीचा काळ, मंगलकार्य योजताना दहा वेळा विचार करावा लागतो. दु:खाच्या प्रसंगातही तीच गत. एखादा पाहुणा येणार असला तरी पाणी पुरेल का? या विचाराने जीव घाबराघुबरा होतो. चार भांडी पाण्यासाठी महिन्याचे दीडशे ते अडीचशे रुपयांची वर्गणी मोजणारी ही वस्ती दिवसातून दोनदा पाणी सोडले तरी समाधानी होईल; पण नगरसेवक, आमदार आणि खासदारांपैकी एकाही लोकप्रतिनिधीला ही हाक कधी ऐकू आलेली नाही. दहा वर्षांपूर्वी विद्यमान आमदार राम कदम यांनी टँकरवरून प्रचारफेरी काढली होती. पाणीप्रश्न सोडवणार हे त्यांच्या जाहीरनाम्यातील प्रमुख वचन. ते आजही कागदावरच आहे, याची आठवण ही लोकवस्ती न विसरता करून देते.

शौचालयांचा प्रश्न

पाण्याखालोखाल इथे अपुऱ्या शौचालयांचा प्रश्न आ वासून उभा आहे. लाखभर लोकसंख्येसाठी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी शौचकुपे असल्याने गैरसोय होते. शौचालयापर्यंत पोहोचण्यासाठी अख्खी वस्ती काहींना तुडवावी लागते. जी आहेत तीही धोकायदायक स्थितीत. काहींना दारे नाहीत. काहींचे उद्घाटन झाले, पण बांधकाम झालेले नाही. महत्त्वाचे म्हणजे या वस्तीत मलनि:सारण वाहिन्या नाहीत. काही शौचालयांना तर मलमूत्र टाक्या (सेप्टिक टँक) नाहीत. त्यामुळे डोंगरावरून खालच्या वस्तीत धावणाऱ्या गटारांमधून मलमूत्र सोडले जाते. या परिस्थितीत डोंगरात राहाणारे अनेक स्त्री-पुरुष आजही उघडय़ा, मोकळ्या जागेत नैसर्गिक विधी आटोपतात. त्यामुळे या वस्तीत दरुगधी आणि रोगराई पसरण्याचा धोका कायम आहे.

आरोग्य सुविधांचा अभाव

येथील मुक्ताबाई रुग्णालयात सोयीसुविधा नाहीत. चार वर्षांपूर्वी पाडलेले पार्कसाइट भागातील रुग्णालय अद्याप उभे राहिलेले नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांना राजावाडी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. आपत्कालीन परिस्थितीत रस्ताच नसल्याने रुग्णवाहिका किंवा वाहन घराजवळ येऊ शकत नाही. त्यामुळे रुग्णाला चिंचोळ्या उतरंडीवरून, वेडय़ावाकडय़ा गल्ल्यांमधून उचलून खाली आणावे लागते.