News Flash

मुंबईवरील पाणी कपातीचं विघ्न टळणार

पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचे आयुक्तांचं आश्वासन, सचिन सावंत यांची माहिती

संग्रहित छायाचित्र

काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेनं मुंबईत २० टक्के पाणी कपातीचा निर्णय जाहीर केला होता. परंतु गणेशोत्सवाच्या पूर्वी मुंबईवरील पाणीकपातीचं संकट टळण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी पाणी कपात रद्द करून पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार असल्याचं आश्वासन दिल्याची माहिती काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी दिली.

“एकंदरीत परिस्थिती काय आहे ते मी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या नजरेस आणून दिली. त्यावर त्यांनी मला पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत केला जाईल,” असं आज आश्वासन दिल्याची माहिती सचिन सावंत यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली. “मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात कमी पाऊस पडल्याने मुंबई महानगर पालिकेला ५ ऑगस्ट पासून २० टक्के पाणी कपात करावी लागली आहे. परंतु सध्या मुंबईत गणेशोत्सवाची तयारी केली जात आहे. लॉकडाउन असल्यामुळे बहुसंख्य महिला घरातच काम करत आहेत. अशा स्थितीत पाणी कपात ही त्रासदायकच आहे. सणासुदीचा विचार करुन पाणी कपातीचा हा निर्णय रद्द करावा व पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी विनंती पालिका आयुक्तांना केली असता त्यांनी तात्काळ दखल घेत पाणी पुरवठा लवकरच सुरुळीत करण्याचे आश्वासन दिलेले आहे,” असं सचिन सावंत म्हणाले. दरम्यान, यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहेल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

जुलै महिन्यात पावसाने मारलेली दडी आणि करोनामुळे स्वच्छतेसाठी झालेला पाण्याचा अतिरिक्त वापर यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा कमी झाला होता. त्यामुळे ५ ऑगस्टपासून पालिकेने २० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतला होता. परंतु त्यानंतर झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2020 6:20 pm

Web Title: water supply will be normal no water cut bmc commissioner iqbal singh chahel congress leader sachin sawant jud 87
Next Stories
1 आरोग्य सेवेला प्राधान्य – मुख्यमंत्री
2 कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा विशेष रेल्वेला अल्प प्रतिसाद
3 विवाहितेची हत्या
Just Now!
X