हजार लिटरमागे २५ पैशांची वाढ; राजकीय विरोधानंतरही प्रशासनाचा निर्णय

गेल्या वर्षभरात प्रशासकीय, आस्थापना, देखभाल आदींवरील वाढलेला खर्च, त्याचबरोबर शासकीय धरणातून उपसा करण्यात येणाऱ्या पाण्यावरील पाणीपट्टीत करण्यात आलेली वाढ यामुळे महापालिकेने मुंबईकरांच्या पाण्याचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात सर्वसामान्य मुंबईकरांना ४ रुपये ६६ पैशांऐवजी ४ रुपये ९१ पैसे दराने प्रतिहजार लिटर पाणी विकत घ्यावे लागणार आहे. प्रशासनाने याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत सादर केलेले निवेदन फेटाळून पाणीपट्टीतील दरवाढ रोखण्याचा प्रयत्न राजकारण्यांनी केला. मात्र पाणीपुरवठय़ावरील खर्च भागविण्याकरिता दरवाढ आवश्यक असल्याचे सांगत प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम होते.

मुंबईकरांना भातसा, मोडकसागर, तानसा, तुळशी, विहार, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी पालिका दर दिवशी ३७५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. धरणांतून जलवाहिनीच्या माध्यमातून जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचलेले पाणी शुद्ध करून नंतर मुंबईकरांच्या घरोघरी रवाना होते. धरणातून मुंबईकरांना घरपोच करण्यात येणाऱ्या पाण्यावरील खर्च वाढला आहे. २०१६-१७ या वर्षांमध्ये जल विभागाच्या आस्थापना खर्चात ५.७४ टक्के, प्रशासकीय खर्चात ३४.५९ टक्के, विद्युतशक्ती खर्चात २.१६ टक्के, सरकारी धरणातून उपसा केलेल्या पाण्याची पाणीपट्टी – १२.३७ टक्के, इतर प्रचालन व परिरक्षण खर्चात – २६.४२ टक्के अशी वाढ झाली आहे. २०१५-१६ मध्ये जलविभागाचा खर्च ७६५.३२ कोटी रुपये होता. तो २०१६-१७ मध्ये ८०६.५६ कोटी रुपयांपर पोहोचला आहे. एकूण खर्चामध्ये झालेल्या सरासरी ५.३९ टक्के वाढीमुळे प्रशासनाने पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

chart

तत्कालिन पालिका आयुक्त सुबोध कुमार यांनी आपल्या कारकीर्दीत सादर केलेल्या अर्थसंकल्पात जल विभागाच्या खर्चात होणारी वाढ आणि राबविण्यात येणाऱ्या जलविषयक प्रकल्पांवरील खर्च लक्षात घेता आवश्यकतेनुसार पाणीपट्टीमध्ये ८ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव समाविष्ट केला होता. त्यास पालिका सभागृहाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता दर वर्षी पाणीपट्टीमध्ये आठ टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्यासाठी स्थायी समिती अथवा पालिका सभागृहाच्या परवानगीची आवश्यकता भासणार नाही. पाणीपुरवठा व मलनि:सारण सेवेच्या दरात वाढ करण्याबाबतचे निवेदन सोमवारी प्रशासनाकडून करण्यात आले. हे निवेदन स्थायी समितीच्या मंजुरीसाठी नव्हे तर केवळ माहितीसाठी सादर करण्यात आले होते. मात्र पाणीपट्टी दरवाढीचा रीतसर प्रस्ताव सादर करण्याची मागणी करीत स्थायी समिती सदस्यांनी हे निवेदन फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र मुळात पालिका सभागृहाने ८ टक्क्यांपर्यंत पाणीपट्टी शुल्कात वाढीची अनुमती दिली आहे. त्यानुसार प्रशासनाने ही दरवाढ केली आहे. पाण्याबरोबरच अधिक ७० टक्के मलनि:सारण आकार या दराने प्रतिहजार लिटर पाणी विकत घ्यावे लागणार आहे.

[jwplayer BLNhZlPb]