26 October 2020

News Flash

प्रतिबंधित क्षेत्रातच पाणी, शौचालयाच्या तक्रारी अधिक

प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातील आरोप

प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातील आरोप

मुंबई : मुंबईतील कुर्ला, मानखुर्द, देवनार, भांडुप, अंधेरी पश्चिम, कांदिवली या भागात प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या सर्वात जास्त असून याच भागात पाणीपुरवठा व शौचालयांशी संबंधित सर्वाधिक तक्रारी आहेत. प्रजा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने तयार केलेल्या वार्षिक अहवालातील आकडेवारीतून हे पुढे आले आहे.

प्रजा फाऊंडेशन या संस्थेने पालिकेच्या कामाविषयीचा वार्षिक अहवाल तयार केला आहे. दरवर्षी प्रमाणे नगरसेवकांच्या कामाचे प्रगतिपुस्तक तयार करण्याची पद्धत बदलून यावेळी संस्थेने नागरी तक्रारींवर भर दिला आहे. रस्ते, पाणी, शौचालय, सांडपाणी याविषयीच्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला आहे. एकूणच मुंबईमध्ये सांडपाणी, कचरा, खड्डे, पाणी, शौचालय याबाबतच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर केल्या जात असून त्या तक्रारी सोडवण्याचा वेग वाढला असल्याची कौतुकाची थाप या अहवालात दिली आहे.

भांडुप, कुर्ला, मानखुर्द-देवनार, अंधेरी पश्चिम, कांदिवली या भागातून सर्वाधिक पाण्याच्या, शौचालयाच्या तक्रारी आलेल्या आहेत.

या भागात आधीच नागरी सुविधा योग्य प्रकारे पुरवलेल्या असत्या तर या भागात संसर्ग आटोक्यात राहिला असता, असा शेरा या अहवालात दिला आहे.

सार्वजनिक शौचालयातून करोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणावर पसरत असल्याचे वास्तव आहे. स्वच्छ भारत अभियानानुसार १०० ते ४०० पुरुषांसाठी एक शौचालय आणि १०० ते २०० महिलांसाठी एक शौचालये उपलब्ध असली पाहिजेत असे प्रमाण असताना सध्या ६९६ पुरुषांसाठी एक शौचालय असे प्रमाण आहे. तर १७६९ महिलांसाठी एक शौचालय असे प्रमाण आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.

पालिकेतील ३५ टक्के पदे रिक्त

करोनाकाळात पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर अतिशय ताण असून पालिकेतील ३५ टक्के पदे रिक्त असल्याचे या अहवालात म्हटले आहे. घनकचरा विभागात १८ टक्के, पाणीपुरवठा विभागात १७ टक्के, पर्जन्य जलवाहिन्या विभागात ४२ टक्के, शिक्षण विभागात ४७ टक्के, रस्ते विभागात ४१ टक्के, आरोग्य विभागात ३३ टक्के जागा रिक्त असल्याचे यात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 4:20 am

Web Title: water toilet complaints more in restricted areas zws 70
Next Stories
1 करोना अहवाल रुग्णालयांनाही कळवा
2 राज्यात ४८७८ नवे रुग्ण
3 अर्णब गोस्वामी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
Just Now!
X