राज्यातील समुद्रकिनाऱ्यावरील जेट्टींचा विकास करून त्यावर जलवाहतूक सुरू करण्यासाठी जलवाहतूक महामंडळ स्थापन करण्याच्या मेरीटाइम बोर्डाच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी गुरुवारी तत्त्वत: मंजुरी दिली. यामुळे प्रवासी फेरी बोट, रो-रो सेवा, मालवाहतूक सुरू होण्यास चालना मिळणार आहे.

महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाची बठक आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. राज्यात सुमारे चारशेहून अधिक जेट्टी आहेत. यातील काही जेट्टी या सुस्थितीत असून काहींची दुरुस्ती आवश्यक आहे.

प्रवासी वाहतूक, क्रूझ शिपिंग, वॉटर स्पोर्ट्स, रो-रो सेवा मालवाहतूक इत्यादीच्या वापरासाठी खासगी उद्योजकांना सुस्थितीतील जेट्टी देण्यास या वेळी मान्यता देण्यात आली.

राज्यातील समुद्रकिनाऱ्यावर १२ नॉटिकल मलापर्यंत किनारा नेव्हिगेशन यंत्रणा बळकट करण्यात येणार आहे. याद्वारे मोबाइलवर कोणताही अडथळा न येता संपर्क साधता येणार आहे. यामुळे पोलीस, तटरक्षक दल व सागरी किनारा सुरक्षा दलांना कोणत्याही अडथळ्याविना संपर्क यंत्रणा उभारता येणार आहे.