|| सचिन धानजी

मुंबईच्या पाणीपुरवठय़ात सुधारणा करण्यासाठी महापालिकेने जलबोगदा प्रकल्प हाती घेतला आहे. चेंबूर अमर महल ते परळच्या सदाकांत ढवण मैदानापर्यंतच्या जलबोगदा प्रकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली असली तरी पाच महिने उलटूनही कामाला सुरुवात झालेली नाही.

कंत्राटदाराकडून बँक हमीची रक्कम तसेच कागदपत्रेच सादर न झाल्याने या प्रकल्पाच्या कामाचा अद्यापही कार्यादेश देण्यात आलेला नाही. त्यामुळे शिवसेनेचा स्वप्नातील हा महत्त्वाचा प्रकल्प लांबला जाण्याची भीती आहे.

चेंबूर अमर महल ते ट्रॉम्बे आणि अमर महल ते परळ या दरम्यानच्या जलबोगदा प्रकल्पाचे काम महापालिकेच्या वतीने प्रस्तावित करण्यात आले आहे. मागील दहा वर्षांपासून हा प्रकल्प कागदावरच असून याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जुलै २०१८मध्ये या कंत्राट कामाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु पाच महिने उलटून गेले तरी याची कागदोपत्री प्रक्रियाच पूर्णच झालेली नसल्याने अद्यापही या प्रकल्पांच्या कामांना सुरुवात झालेली नाही.

या दोन्ही प्रकल्पांसाठी स्वतंत्रपणे कंत्राट कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे. यासाठी अनुक्रमे ७०० ते १००० कोटींची कंत्राटे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे या कंत्राट कामांना एव्हाना सुरुवात होणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात कामालाच सुरुवात झालेली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कंपन्यांकडून अमानत रक्कम तसेच बँक हमी सादर करण्यात न आल्याने या कामांना विलंब झाल्याचे समजते आहे. अनामत रक्कम भरण्यास काही तांत्रिक अडचणीही निर्माण झाल्या असून वारंवार सुचना करूनही ही रक्कम आणि बँक हमीपत्र सादर केले जात नाही.

अमर महल ते ट्रॉम्बे येथील जलबोगद्याच्या कामाची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांना कार्यादेश देण्यात आला आहे. तर अमर महल ते परळपर्यंतच्या जलबोगदा प्रकल्पाच्या कामांमध्ये तांत्रिक अडचणी असून त्यांच्याकडून लवकरच ही कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना कार्यादेश देण्यात येतील, असे जलअभियंता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

स्थायी समितीने मान्यता दिल्यानंतर या प्रकल्पांची कामे सुरू व्हायला हवी होती. आधीच या प्रकल्पाला विलंब झालेला आहे. त्यातच या प्रकल्प कामांना मंजुरी देऊनही जर विलंब होत असेल तर ही गंभीर बाब आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक कोणी यामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न करतोय, असा सवाल करत यासंदर्भात जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन नक्की या प्रकल्पाची कामे का सुरू झाली नाहीत याची माहिती घेतली जाईल, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले.