मुंबई : घाटकोपर पूर्वेतील कामराज नगर परिसरात जाण्यासाठी महत्त्वाचा असणारा भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचत असल्यामुळे  परिसरातील नागरिकांना त्यातून वाट काढावी लागत आहे. महापालिकेने भुयारी मार्गांत साचलेले पाणी उपसण्यासाठी पंप बसवला असला तरी दिवसातून एकदाच हा पंप सुरू केला जातो. परिणामी पाणी पुन्हा साचून राहते, अशी नागरिकांची तक्रार आहे.

परिसरात एक लाखांहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. या ठिकाणच्या नागरिकांना रेल्वे स्थानक अथवा बाजारपेठ परिसरात ये-जा करण्यासाठी कामराज नगर भुयारी मार्ग वापरावा लागतो. मात्र, हा भुयारी मार्ग सखल भागात असल्यामुळे या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते.   प्रशासनातर्फे दरवर्षी पावसाळ्यात पंप बसविला जातो. मात्र पंप दिवसातून एकदाच दुपारी १२ वाजता सुरू केला जातो.  त्यामुळे इतर वेळेत पाऊस आल्यास पुन्हा पाणी साचते.  याबाबत एन वॉर्ड साहाय्यक आयुक्त अजितकु मार आंबी यांना विचारले असता त्यांनी, कामराज नगर परिसरातील भुयारी मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असून पाणी साचू नये म्हणून बांधकाम वा अन्य उपाययोजना या त्या विभागाने करणे अपेक्षित आहे, असे सांगितले. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही पंप लावून साचलेले पाणी उपसतो. मात्र सध्या करोनामुळे अनेक खात्यात पुरेसे मनुष्यबळ नाही. परिणामी पाणी उपसण्याच्या  कामात अडचणी येतात. याविषयी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून ही समस्या लवकर सोडवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

पूर्व-द्रुतगती महामार्गावर वाहने भरधाव वेगाने धावत असल्यामुळे आम्हाला भुयारी मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र, पावसाळ्यात पाणी साचत असल्याने आमची गैरसोय होते. या ठिकाणी निर्जंतुकीकरण होत नसल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे.

-राजेश पवार, स्थानिक रहिवासी