एकीकडे दुष्काळाच्या चाहुलीने ग्रामीण भागातील लोकांच्या तोंडचे पाणी पळालेले असताना राज्याच्या शहरी भागात मात्र आजही पाण्याची चंगळ सुरू आहे. मुंबई वगळता ठाणे, नवी मुंबई, पुणे अशा प्रमुख शहरांत राष्ट्रीय मानकांपेक्षा दुप्पट पुरवठा होत असून या वर्षी धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा जमा झाल्यावरही मुंबईव्यतिरिक्त एकाही पालिकेला पाणीकपातीची झळ बसलेली नाही. ग्रामीण भागात प्रतिमाणशी प्रतिदिन ५० लिटर पाणीही मिळत नसताना पुण्यात ३०० लिटर, तर नवी मुंबई, ठाण्यात २५० लिटर पाणी उधळले जात आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत सरासरीपेक्षा पन्नास टक्केही पाऊस न झाल्याने राज्यातील धरणांमध्ये सरासरी अवघे ४८ टक्के पाणी शिल्लक आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ७० टक्के पाणी जमा आहे. मात्र शहराची सवा कोटी लोकसंख्या व उद्योग-व्यवसायांचा आवाका लक्षात घेऊन शहरात २० टक्के पाणीकपात लागू झाली आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड या पाच महानगरपालिकांच्या पाणीपुरवठय़ाचा आढावा ‘लोकसत्ता’ने घेतला. तेव्हा दरडोई उधळले जाणारे पाणी डोळे विस्फारायला लावणारे आहे. केंद्राकडून ठरवण्यात आलेल्या जलधोरणानुसार शहरात प्रतिव्यक्ती प्रतिदिन १४० लिटर पाणी आवश्यक असते. प्रत्यक्षात मुंबईत १३५ लिटर, ठाण्यात २०० लिटर, नवी मुंबई येथे २५० लिटर, पुण्यात ३०० लिटर, तर पिंपरी चिंचवडमध्ये २४० लिटर पाणी पुरवले जात आहे. अर्थात मुंबईत असलेली ६० टक्के झोपडपट्टी व त्यात प्रति माणशी होणारा केवळ ६० ते ७० लिटर पुरवठा लक्षात घेतला, तर मध्यम व उच्चवर्गातील पाण्याचे प्रमाण २५० लिटरहून अधिक जाते.
पाण्याची ही वारेमाप उधळपट्टी होण्यामागे पाण्यासाठी लागणारे अत्यल्प शुल्क हेदेखील कारण आहे. नवी मुंबईत दर महिन्याला ३० हजार लिटर पाण्यासाठी अवघे पन्नास रुपये आकारले जातात. मुंबईत झोपडपट्टीत दर हजार लिटरसाठी साडेतीन, तर इतरांसाठी साडेचार रुपये दर आहे. याचा अर्थ दिवसाला हजार लिटर पाणी वापरणाऱ्याला महिन्याला १५० रुपयांपेक्षा अधिक खर्च येत नाही. ठाणे, पुणे येथेही हीच स्थिती आहे. ग्रामीण भागात दिवसाला पाण्याची एक कळशी मिळवताना मारामार सुरू झालेली असताना शहरात मात्र अजूनही दुष्काळाचा गंधही नाही. कोणत्याही धरणात ७० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी साठलेले नसतानाही मुंबई वगळता यातील एकाही शहरात पाणीकपातीचा निर्णय घेतलेला नाही.

मुंबई
धरणे : तानसा, मोडकसागर, विहार, तुळशी, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा.
पाणीसाठय़ाची क्षमता : १४ लाख दशलक्ष लिटर
सध्या उपलब्ध पाणी : ९ लाख ६९ हजार दशलक्ष लिटर
साठय़ाची टक्केवारी : ६९ टक्के
दर दिवशी लागणारे पाणी : ३७५० दशलक्ष लिटर
लोकसंख्या : १ कोटी २५ लाख ८४ हजार १३९
दरडोई पाणी : १३५ लिटर
पाणीकपात : वीस टक्के

ठाणे
पाण्याचे स्रोत : ठाण्यासाठी स्वतंत्र धरण नाही. मुंबई महापालिकेकडून ५० दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १०० दशलक्ष लिटर, स्टेम प्राधिकरणाकडून १५० आणि ठाणे महापालिकेच्या योजनेतून २०० दशलक्ष लिटर पाणी रोज पुरवले जाते.
वर्षभराची पाण्याची गरज – १ लाख ६४ हजार २५० दशलक्ष लिटर
दर दिवशी लागणारे पाणी – ४५० दशलक्ष लिटर
लोकसंख्या – २१ लाख
दरडोई पाणी – २०० लिटर

नवी मुंबई
धरणे – मोरबे, बारवी
पाणीसाठय़ाची क्षमता – १ लाख ९१ हजार दशलक्ष लिटर
सध्या उपलब्ध पाणी – १ लाख ०८ हजार दशलक्ष लिटर
साठय़ाची टक्केवारी – ५६ टक्के
दर दिवशी लागणारे पाणी – ४७५ दशलक्ष लिटर
लोकसंख्या – १४ लाख
दरडोई पाणी – २५० लिटर

पुणे
धरणे – पवना
पाणीसाठय़ाची क्षमता – २९.१५ टीएमसी (८ लाख २५ हजार ४०० दशलक्ष लिटर)
सध्या उपलब्ध पाणी – १४.८३ टीएमसी (४ लाख २० हजार दशलक्ष लिटर)
साठय़ाची टक्केवारी – ५०.८९ टक्के
दर दिवशी लागणारे पाणी – ११८० दशलक्ष लिटर
लोकसंख्या – ३५ लाख
दरडोई पाणी – ३०० लिटर

पिंपरी चिंचवड
धरणे – पवना
पाणीसाठय़ाची क्षमता – ८.६ टीएमसी (२ लाख ४३ हजार ५०० दशलक्ष लिटर)
सध्या उपलब्ध पाणी – ६.२८ टीएमसी (१ लाख ७७ हजार ८०० दशलक्ष लिटर)
साठय़ाची टक्केवारी – ७३ टक्के
दर दिवशी लागणारे पाणी – ११८० दशलक्ष लिटर
लोकसंख्या – १५ लाख