26 October 2020

News Flash

ऑनलाइन अध्यापन मार्गदर्शन वर्गाचे पेव

अनेक शाळा, महाविद्यालयांनी ऑनलाइन वर्ग घेण्याचे आदेश

संग्रहित छायाचित्र

करोना प्रादर्भावाच्या या काळात भरभराट झालेल्या ऑनलाइन शिक्षणाच्या बाजारपेठेला जोडून ऑनलाइन शिक्षण कसे द्यावे याचे शिक्षकांना मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळा, अभ्यासवर्गाचेही पेव फुटले आहे.

सध्या सर्वच स्तरातील आणि प्रकारातील शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचा आग्रह धरल आहे. ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या विविध प्रणाली, संकेतस्थळे यांचे पेव फुटले आहे. अगदी पूर्वप्राथमिक वर्गापासून ते पदव्युत्तर अभ्यासक्रमांपर्यंतचे शिक्षण सध्या ऑनलाइनच सरू आहे. ई-साहित्य तयार करण्यासाठी काही प्रमाणात शिक्षकांनीही पुढाकार घेतला आहे. मात्र त्याचवेळी संगणक वापराचे प्राथमिक ज्ञानही नसलेला शिक्षकांचा एक मोठा वर्ग आहे. ऑनलाइन शिकवायचे असेल तर या शिक्षकांनाच आधी विद्यार्थी होण्याची वेळ आली आहे. त्यांच्यासाठी ऑनलाइन अध्यापन कसे करावे याचे मार्गदर्शन करणारे ऑनलाइनच वर्ग, कार्यशाळा यांचे पेव फुटले आहे. अनेक शाळा, महाविद्यालयांनी ऑनलाइन वर्ग घेण्याचे आदेश दिले असले तरी शिक्षकांना त्याचे प्रशिक्षण मात्र देण्यात आले नाही.

या कार्यशाळांमध्ये काय होते

वेगवेगळी माध्यमे, प्रणाली कशा वापराव्यात याचे प्रशिक्षण या कार्यशाळांमध्ये देण्यात येते. काही हजार रुपयांचे शुल्क असलेले बहुतेक अभ्यासवर्ग आणि कार्यशाळा तीन दिवसांपासून पंधरा दिवसांच्या कालावधीच्या आहेत. ऑनलाइन वर्ग सुरू असताना काय काळजी घ्यावी, कॅमेरा कसा वापरावा, विद्यार्थ्यांशी संवाद कसा साधावा, सादरीकरण, ध्वनीचित्रफिती यांचा वापर कसा करावा याबाबत प्राथमिक माहिती दिली जाते. अनेकदा शिक्षक घरातून शिकवत असताना त्यांच्या घरातील आवाज, व्यक्तींचा वावर हे सगळे विद्यार्थ्यांना दिसते. अशा चुका कशा टाळाव्यात याबाबतही माहिती दिली जाते. अगदी स्थानिक पातळीवरील अनेक संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था, ऑनलाइन शिक्षणासाठी नावाजलेली संकेतस्थळे यांवर या कार्यशाळा होत आहेत. मात्र, त्याची वैधता, दर्जा यांबाबत मात्र प्रश्न आहेत.

आता नव्या प्रणालीची तयारी

संगणक वापराचे प्राथमिक ज्ञान असले तरी अनेक ज्येष्ठ प्राध्यापक आणि शिक्षकांना नव्या प्रणाली वापरण्यास अडथळे येतात. सध्या अनेक शिक्षणसंस्थांच्या बैठका, ऑनलाइन कार्यशाळा या झूम प्रणालीच्या माध्यमातून होत होत्या. ही प्रणाली कशी वापरावी हे समजून घेण्यात शिक्षकांचे काही दिवस गेले. ती अंगवळणी पडल्यानंतर अनेक महाविद्यालयांनी ही प्रणाली न वापरण्याच्या सूचना दिल्या. पुन्हा नव्या प्रणालीशी जुळवून घेण्याचा खटाटोप करावा लागत आहे.

शिक्षण, घरकाम करताना शिक्षिकांची कसरत

पुणे : सध्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने वर्ग सुरू झाले आहेत. शिक्षिका घरातूनच विद्यार्थ्यांना अध्यापन करत आहेत. मात्र, ऑनलाइन शिक्षण आणि घरकाम या दोन्ही जबाबदाऱ्या निभावण्याची कसरत शिक्षिकांना करावी लागत आहे.  पुण्यातील एका शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती बोधे म्हणाल्या, की ऑनलाइन शाळा आणि घर हे दोन्ही करताना धावपळ होत आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवण्यासाठी पीपीटी तयार कराव्या लागत असल्याने त्यासाठी तयारी करावी लागते. शाळेच्या बैठका, चर्चा होत असतात. त्याशिवाय घरातील स्वयंपाक आणि बाकीची कामेही करावी लागतात. एकाच वेळी दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना तारांबळ होते. सर्वसाधारण काळात शाळेच्या वेळेत शाळेची कामे आणि बाकीचा वेळ घरी देणे शक्य होते. आता ऑनलाइन शिक्षणामुळे घरी पुरेसा वेळ देता येत नाही. सुरुवातीला ऑनलाइन शाळा आणि घरची कामे करणे हे दोन्ही जमवताना खूप धावपळ झाली. आता घरच्या कामांसाठी वेळापत्रकच तयार केले आहे. त्यानुसार घरी कामे करावी लागतात. पण या काळात कुटुंबीयांकडूनही सहकार्य मिळते. पण दोन्ही कामे करताना थोडी जास्त दगदग होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 12:12 am

Web Title: wave of online teaching guidance classes abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 राज्यात ७ कोटी लोकांना अन्नधान्य योजनेचा लाभ
2 एसटीत स्वेच्छानिवृत्ती योजना?
3 केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांसह ‘या’ कर्मचाऱ्यांना मुंबई लोकल प्रवासाची मंजुरी
Just Now!
X