आधुनिक जीवनशैलीतून दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यातील एक प्रमुख डोकेदुखी ठरलेल्या प्लॅस्टिकचे सूक्ष्मातिसूक्ष्म तंत्रज्ञानाच्या (नॅनो टेक्नॉलॉजी) आधारे विघटन करून त्यापासून मेण आणि द्रवरूप इंधन बनविण्यात अंबरनाथ येथील साऊथ इंडियन संस्थेच्या संशोधन आणि विकास प्रकल्पाचे संचालक डॉ. माधुरी आणि डॉ. महेश्वर या शरण दाम्पत्यास यश आले आहे. सध्या डोंबिवलीजवळील निळजे गावातील सवरेदय विद्यालयात या पर्यावरणस्नेही प्रयोगाची अंमलबजावणी सुरू आहे. पॉलिश करण्यासाठी वापरले जाणारे तसेच बत्तीचे अशा दोन्ही प्रकारचे मेण प्लॅस्टिकपासून मिळते. तसेच या प्रक्रियेतून तयार होणारे द्रवरूप इंधन पेट्रोलला पर्याय ठरू शकते. दुचाकीत वापरून करण्यात आलेल्या पी.यू.सी. चाचणीतही हे इंधन उत्तीर्ण झाले आहे.  
अंबरनाथ येथील साऊथ इंडियन संस्थेच्या नॅनॉ टेक्नॉलॉजी केंद्रात डॉ. माधुरी शरण आणि डॉ. महेश्वर शरण या संशोधक दाम्पत्याच्या मार्गदर्शनाखाली जीव, भौतिक तसेच रसायनशास्त्रातील विविध विषयांमध्ये पीएच.डी. करणारे विद्यार्थी संशोधन करीत आहेत. डॉ. महेश्वर शरण आयआयटीमध्ये प्राध्यापक तर डॉ. माधुरी शरण रिलायन्समध्ये संशोधन आणि विकास प्रकल्पात संचालक म्हणून कार्यरत होत्या. वयाची सत्तरी पार केलेले हे जोडपे  दररोज सकाळी दहा ते संध्याकाळी सहा संशोधन केंद्रात तरुण संशोधकांना मार्गदर्शन करीत आहेत. विशेष म्हणजे उसाचा रस काढून शिल्लक राहिलेली चिपाडे, नारळाचा काथ्या अशा एरवी कचरा ठरणाऱ्या वस्तूंपासून सूक्ष्मातिसूक्ष्म तंत्रज्ञानाच्या आधारे बहुमूल्य अशा उत्पादनात रूपांतर करण्याचे प्रयोग या केंद्रात सुरू आहेत. २००९ पासून शरण दाम्पत्य येथे कार्यरत आहेत. सुरुवातीची काही वर्षे डॉ. माधुरी शरण यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणूनही काम पाहिले.
नेमक्या व्याधीवर औषधोपचार शक्य
सूक्ष्मातिसूक्ष्म तंत्रज्ञानाच्या आधारे विविध व्याधींवर नेमकेपणाने औषधांची मात्रा देण्याचे प्रयोगही येथे सुरू आहेत. कर्करोगासारख्या व्याधींमध्ये या संशोधनाचा उपयोग होऊ शकेल. सध्या कर्करोगग्रस्त पेशींवर उपचार करणारी पद्धत अस्तित्वात नाही. त्यामुळे केमोसारख्या उपायांमुळे व्याधिग्रस्त पेशींबरोबरच चांगल्या पेशींनाही अपाय होतो. इतर अनेक व्याधींमध्येही सरसकट औषधांच्या वापरामुळे होणारे साइड इफेक्ट टाळणे या तंत्रज्ञानामुळे शक्य होणार आहे.
परीक्षा नळीत रोप लागवड
वनस्पतींच्या सूक्ष्मातिसूक्ष्म अवशेषापासून नव्या रोपांची निर्मिती करणे सूक्ष्मातिसूक्ष्म तंत्रज्ञानामुळे शक्य झाले. अंबरनाथ येथील केंद्रात हे तंत्र वापरून सध्या परीक्षा नळ्यांमध्ये (टेस्ट टय़ूब) बांबू आणि सर्पगंधा या दोन वनस्पतींच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. अशा प्रकारे इतरही रोपांची लागवड आता प्रयोगशाळेत करता येईल, अशी माहिती डॉ. माधुरी शरण यांनी दिली.
सौरऊर्जा होणार किफायतशीर  
 पारंपरिक ऊर्जेच्या चणचणीवर सौरऊर्जा हा शाश्वत मार्ग असला तरी सध्या ही ऊर्जा मिळविण्यासाठी लागणारे पॅनल खूप महाग आहेत. त्यामुळे सौर ऊर्जेच्या वापरावर मर्यादा आल्या आहेत. अंबरनाथ येथील नॅनॉ टेक्नॉलॉजी केंद्रात भारत आणि जपान या दोन देशांच्या संयुक्त विद्यमाने कार्बनचे पॅनल बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला अनुकूल प्रतिसाद मिळत असून त्यामुळे सौर ऊर्जेचा खर्च निम्म्याने कमी होईल, असा विश्वास डॉ. महेश्वर शरण यांनी व्यक्त केला.
रडारलाही चकवा
शत्रूच्या रडार यंत्रणेला चकवा देऊ शकेल, अशा प्रकारचा विशिष्ट रंग तयार करणेही सूक्ष्मातिसूक्ष्म तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. अंबरनाथ येथील केंद्रात ही कार्बन भुकटी तयार करण्यात तरुण संशोधकांना यश आले आहे. विमानांना हा रंग दिल्यास रडार यंत्रणेला त्यांचा सुगावा लागत नाही.