News Flash

सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीतून कचरावेचकांच्या उन्नतीचा मार्ग

प्रकल्पात सुक्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात आहेच; पण कचरावेचक कामगारांचे पुनर्वसनही करण्यात आले आहे.

वांद्रे येथील केंद्रात सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येते.

मुंबई महापालिकेचा वांद्रय़ात आदर्श प्रकल्प; अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या कामगारांचे पुनर्वसन

रस्त्यावर मिळणारा सुका कचरा गोळा करायचा आणि तो विकून मिळालेल्या पैशातून नशा करायची आणि दिवस ढकलायचा असे आयुष्य जगणाऱ्या कचरावेचकांना मुंबई महापालिकेच्या एका प्रकल्पाने प्रगतीचा नवा मार्गच खुला करून दिला आहे. पालिकेच्या ‘एच’ पश्चिम विभाग कार्यालयाने वांद्रे परिसरात सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक अभिनव प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पात सुक्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात आहेच; पण कचरावेचक कामगारांचे पुनर्वसनही करण्यात आले आहे.

मुंबईतील कचराभूमींची क्षमता कधीचीच संपली आहे. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, यासाठी पालिकेकडून वेगवेगळे पर्याय शोधले जात आहेत. त्याचप्रमाणे कचराभूमीवर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठीही पालिका प्रशासन विविध उपाय राबवत आहे. मोठय़ा गृहसंकुलांनी ओला कचरा आपल्या आवारात जिरवणे पालिकेने बंधनकारक केले असले तरी, तेथून गोळा होणाऱ्या सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न कायम आहे. या पाश्र्वभूमीवर वांद्रे येथील ‘एच’ पश्चिम विभाग कार्यालयाने राबवलेला प्रकल्प मुंबईच नव्हे तर अन्य महापालिकांसाठीही पथदर्शी ठरणार आहे.

कार्डबोर्ड, कागद, बिस्किटांचे, खाद्य पदार्थाची रिकामी पाकिटे, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या अशा नाना प्रकारच्या सुक्या कचऱ्यापैकी रद्दी, बाटल्या, खोके असा कचरा रद्दीवाल्यांकडे विकला जातो. तरीही उरलेला कचरा रस्त्यावर येतो. ही बाब लक्षात आल्यानंतर एच पश्चिम विभागाचे साहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी या विभागात कचरा गोळा करणाऱ्या ३० ते ४० कचरावेचकांना एकत्र करून आसरा वेल्फेअर असोसिएशनच्या सहकार्याने सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणाचा प्रकल्प सुरू केला. या परिसरातील पालिकेच्या सुका कचरा वर्गीकरण केंद्राला एखाद्या कारखान्यासारखे स्वरूप आले आहे. तेथे जमा होणारा सुका कचरा वेगवेगळा करून त्याच्या वर्गीकरणानुसार गाळे तयार करण्यात आले आहेत. सुमारे साडेचारशे कचरावेचक कामगार अविरतपणे या केंद्रात कचरा वर्गीकरणाचे काम करत असतात.

केवळ कचरा वर्गीकरणासाठीच नव्हे तर, रस्त्यावरील सुका कचरा गोळा करण्यासाठीही या कामगारांची मदत घेण्यात आली आहे. एच विभागाने या प्रकल्पाकरिता या कामगारांना कचरा गोळा करण्यासाठी तीन चाकी सायकल, टेम्पो अशी यंत्रणा आणि जागा दिली. कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे याचे प्रशिक्षणही दिले, त्यांना घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी मार्गही आखून दिले.  त्यामुळे रोज इकडेतिकडे कचरा गोळा करत फिरणारे कचरावेचक आता इथे आपल्याला जमेल त्या वेळेत येऊन जमेल तेवढा कचरा वर्गीकरण करतात.

कचऱ्यातून कमाई

वांद्रय़ातील या केंद्रात दररोज किमान २० टन सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. त्यातून कचरावेचकांना चांगला मोबदला मिळू लागला आहे. पूर्वी हे कचरावेचक मिळेल तो कचरा विकून रोजचा दिवस ढकलत होते. मात्र, आता त्यांना खात्रीशीर कमाई उपलब्ध झाली आहे. यापैकी काही कामगार अमली पदार्थाच्या आहारी गेले होते. मात्र, त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. सर्व कामगारांचा लीलावती रुग्णालयात वैद्यकीय विमा उतरवण्यात आला. त्यांना बँकेत खाती उघडून देण्यात आली. त्यांच्या मुलांना पालिकेच्या शाळेत शिक्षणही दिले जाते, अशी माहिती ‘एच’ पश्चिमचे साहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.

‘निती’ आयोगाकडून दखल

निती आयोगानेही या प्रकल्पाची दखल घेतली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कचऱ्याच्या पुनर्वापरासाठी धोरण ठरवण्यासंदर्भात एक परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले होते.

या प्रकल्पामुळे कचरावेचकांना मोठय़ा प्रमाणावर मोबदला मिळू लागला असून त्यांचे आयुष्य पालटून गेले आहे. त्यांच्या या कामाला प्रतिष्ठा आणि आर्थिक सुरक्षादेखील मिळाली आहे.

– शरद उघडे, साहाय्यक आयुक्त, एच पश्चिम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 12:29 am

Web Title: way of advancement of waste from waste disposal
Next Stories
1 विक्रोळीत भरधाव ट्रक उलटला, रस्त्याच्या कडेला थांबलेल्या चौघांचा मृत्यू
2 औद्योगिक ग्राहकांसाठी ऊर्जा विभागाची धडपड
3 अग्निसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या  ठाण्यातील रुग्णालयांना टाळे ठोका! – न्यायालय
Just Now!
X