‘लोकसत्ता’च्या ‘मार्ग यशाचा’ या करिअर मार्गदर्शन कार्यशाळेला दुसऱ्या दिवशीही हजारो विद्यार्थ्यांनी हजेरी लावत करिअर निवडीबाबतचा मनातील गोंधळ दूर करून घेतला. या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमामुळे आमच्या मनातील गोंधळ दूर झालाच शिवाय आपल्याला नेमके काय करायचे आहे व त्यासाठी कोणत्या दिशा धुंडाळायच्या याचे चित्र स्पष्ट झाले, अशी भावना या उपक्रमासाठी आलेल्या विद्यार्थी-पालकांनी व्यक्त केली.
‘लोकसत्ता’च्या वतीने प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात ‘मार्ग यशाचा’ या दोन दिवसीय उपक्रमाची शुक्रवारी सांगता झाली. त्या वेळी या उपक्रमाला पालक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सत्र सुरू असताना सर्वजण अत्यंत तत्परतेने माहिती टिपून घेत होते आणि प्रत्येक सत्राची सांगता झाल्यानंतर मार्गदर्शकांकडे प्रश्न विचारण्यासाठी विद्यार्थी-पालकांची झुंबड उडत होती. एवढेच नव्हे, तर करिअर मार्गदर्शन करणाऱ्या प्रदर्शनालाही विद्यार्थी-पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
आज आम्ही विद्यार्थी असतो तर ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमामुळे आम्हालाही करिअरच्या नव्या वाटय़ा खुल्या झाल्या असत्या, अशी भावना पालकांनी व्यक्त केली. तर निकाल तोंडावर असल्याने पुढे काय या प्रश्नाच्या ताणाखाली वावरणाऱ्या विद्यार्थ्यांना अगदी योग्य वेळी उत्तर सापडल्याचे समाधान वाटत होते.
पहिल्या दिवशीप्रमाणे दुसऱ्या दिवशीही मानसोपचारतज्ज्ञ
डॉ. हरिश शेट्टी, ‘सॉफ्ट स्कील्स’ प्रशिक्षक गौरी खेर, कला-वाणिज्य आणि विज्ञान शाखेबाबतच्या करिअर मार्गदर्शक मुग्धा शेटय़े, ज्येष्ठ शिक्षिका अनुराधा गोरे यांनी करिअर विषयीच्या व्याख्या विविध पद्धतीने पालक-विद्यार्थ्यांसमोर सुस्पष्ट केली. त्याचे वेगवेगळे पैलू मांडले.
डॉ. हरिश शेट्टी यांनी पालक आणि पाल्यांचे संबंध करिअरची निवड करतेवेळी कसे असावेत याविषयी मार्गदर्शन केले. तर करिअर घडविताना अभ्यासासोबत ‘सॉफ्ट स्कील्स’ही किती महत्त्वाच्या असतात याचे महत्त्व गौरी खेर यांनी पटवून दिले.
याशिवाय मुग्धा शेटय़े आणि स्नेहल महाडिक यांनी कला-वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विविध अभ्यासक्रमांची माहिती देत त्यात कशाप्रकारे करिअर घडविता येऊ शकते याचा आलेखच विद्यार्थी-पालकांसमोर मांडला.

मुग्धा यांनी कला आणि वाणिज्य शाखेतील, तर स्नेहल यांनी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध संधींची ओळख करून दिली. तर उपक्रमाच्या शेवटच्या सत्रात अनुराधा गोरे यांनी विविध उदाहरणे देत यश-अपयशाकडे पाहण्याचा विद्यार्थी-पालकांचा दृष्टीकोन कसा असला पाहिजे याचे मार्गदर्शन केले.