यंदा दुष्काळाच्या सावटाने सर्वाच्याच तोंडचे पाणी पळालेय.. पण पाण्याचे महत्त्व पटवण्यासाठी दुष्काळाची गरज नाही. माणसांप्रमाणेच प्राण्यांना आणि झाडांनाही त्याची आत्यंतिक गरज. पाण्याच्या शोधासाठी माणसे जशी मैलोन्मैल भटकंती करतात अगदी त्याचप्रमाणे पर्यावरणातील इतर सजीवही पाण्यासाठी आपल्या सर्व शक्ती पणाला लावतात आणि त्यामुळेच अनेक अचाट गोष्टी आपल्याला पाहायला, अनुभवायला मिळतात. सर्व सृष्टीत, प्राणिमात्रांत अस्तित्व दाखवणाऱ्या पाण्याच्या अशा रम्य कथा ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत ‘आपण आणि पर्यावरण’ या दोन दिवसांच्या परिषदेत तज्ज्ञांकडून ऐकायला मिळतील. ‘लोकसत्ता’ने ‘टीजेएसबी सहकारी बँक लि.’च्या सहकार्याने ही परिषद ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी आयोजित केली आहे. या परिषदेला रिजन्सी ग्रुपचे आणि केसरीचे सहकार्य लाभले आहे. या परिषदेत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सहभागी होत आहेत. पाण्याच्या सजीवांशी असलेल्या रोमांचकारी नात्यासोबतच या पाण्याशी मानवाने केलेला खेळ, त्यातून झालेली हानी आणि पाण्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सुरू असलेल्या भगीरथी प्रयत्नांची गाथाही या वेळी उलगडली जाईल.
या परिषदेतील ‘पाणी नेमके कुठे मुरतेय..’ या चर्चासत्रात पाण्याचा मागोवा घेतला जाईल.
पाण्याचा दुष्काळ आणि एकूणच पर्यावरणाच्या हानीचा प्रभाव इतर सजीवांसोबतच मानवावरही दिसतो. पर्यावरणाचे मानवाच्या सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्यावरही परिणाम होतात.
अनेक गावे उजाड होतात तेव्हा विस्थापित झालेल्या जनसमुदायासोबतच तेथील संस्कृतीलाही धक्का पोहोचतो. मानव-वन्यप्राणी संघर्ष हा तर अनेक पदर असलेला विषय. त्यातच शहरी भागांतील आरोग्य समस्यांचे मूळ अनेकदा प्रदूषणामध्ये सापडते. त्यामुळेच वन्यजीव अभ्यासक, समाज वैद्यकाचा अभ्यास करणारे तज्ज्ञ आणि सामाजिक परिस्थितीचा व्यापक दृष्टीने विचार करणाऱ्या मान्यवरांकडून ‘पर्यावरणीय असंतुलन आणि आपण’ हा विषय मांडला जाईल. यासोबतच जंगलांच्या कथा आणि व्यथा, शहरी पर्यावरण, कचरा आणि पर्यावरणातील अर्थकारण आदी विषयांवरही परिसंवाद होतील.

पर्यावरणाचा प्रश्न हा राज्यासाठी महत्त्वाचा असल्यामुळे महाराष्ट्राची बँक असलेल्या ‘टीजेएसबी सहकारी बँक लि.’ने या आणि अशा अनेक विषयांचा पाठपुरावा करण्यासाठी ‘बदलता महाराष्ट्र’मध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाद्वारे राज्यातील गंभीर समस्यांवर मार्ग काढण्यात निश्चितच मदत होईल.
– सतीश उतेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक, टीजेएसबी बँक