News Flash

“बाळासाहेब असते तर तुमच्या या नेभळट प्रकाराला त्यांनी चोप दिला असता”; चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर घणाघात!

“...अन्यथा आपला पुरूषार्थ फक्त एकट्या महिलेला मारहाण करण्यापुरताच आहे हे कबूल करावे.” असं आव्हान देखील दिलं आहे.

“सर्टिफाईड व नॉनसर्टिफाईड गुंडांसोबत चारहात करण्यासाठी महाराष्ट्रातल्या आम्ही जिजाऊच्या लेकी सक्षम आहोत.” असं देखील म्हणाल्या आहेत.

“हिंमत दाखवतं सामनात अग्रलेख लिहून सोनिया गांधी यांना वक्फ बोर्डाच्या जमिनी घोटाळ्यासंदर्भात सार्वजनिकरित्या खुलासा मागावा, अन्यथा आपला पुरूषार्थ फक्त एकट्या महिलेला मारहाण करण्यापुरताच आहे हे कबूल करावे.” असं आव्हान भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलं आहे.

शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

मुंबईत बुधवारी शिवसेना भवनासमोर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी तिथे शिवसेना कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठा वाद झाला आणि त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. दरम्यान, यावेळी काही शिवसैनिकांकडून एका महिला कार्यकर्तीस देखील माराहाण झाल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आलेला आहे. हा आरोप शिवसेनेने फेटाळला आहे. तर, यावरून आता भाजपा नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील या प्रकरावर प्रतिक्रिया देत, भाजपाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलेलं आहे.

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठे आणि आज महिलांवर हात उगारणारी शिवसेना कुठे?”

तसेच, शिवसेनेकडून गुंडगिरी सुरू असल्याची टीका भाजपाकडून सुरू झाल्यानंतर त्यावर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. “होय, आम्ही गुंड आहोत. ते सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टिफाईड आहोत. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत”, असं संजय राऊत म्हणाले आहेत. यावरून आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर घणाघात केला आहे.

एकट्या महिलेवर हल्ला करणं म्हणजे अस्मिता जोपासणं आहे का? –

“संजय राऊत, एकट्या महिलेवर हल्ला करणं म्हणजे अस्मिता जोपासणं आहे का? हेच आपले संस्कार आहेत? बाळासाहेब असते तर तुमच्या या नेभळट प्रकाराला त्यांनी चोप दिला असता. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवनाला एक गरिमा व अस्मिता मिळवून दिली. आपण आपल्या या वसुली सरकारच्या कार्यकाळात, सचिन वाझे सारख्यांना त्या ठिकाणी बसवून त्याचं वसुलीभवन करून टाकलं.” असं चित्रा वाघ यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

“…शिवसेनेने आज आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली”; आशिष शेलार यांचा घणाघात!

तसेच, “तुम्हाला जर राम मंदिराबाबत काहीही शंका असत्या, तर तुम्ही त्या राम मंदिर समितीला विचारू शकला असता. पण तुम्ही तसं न करता, मुद्दामहून सार्वजनिकरित्या अफवांना आपल्या लेखनीतून समर्थन दिलं आणि त्यावरून आपली हिंदू विरोधी भूमिका आणि सत्तेसाठीचा लाळघोटेपणा दिसतो.” अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

सोनिया गांधींच्या वफ्फ बोर्ड जमीन घोटाळ्याचा खुलासा मागवा –

“संजय राऊत आपल्याला एक आव्हान आहे, आपण आपल्या याच लेखणीतून सामनाच्या अग्रलेखात सोनिया गांधींचं वफ्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्याचं जे प्रकरण होतं, त्याचा खुलासा आपण मागवा आणि तो सार्वजनिकरित्या तुमच्या सामानाच्या अग्रलेखात तुम्ही करा. नाहीतर तुमचा पुरषार्थ हा फक्त एकट्या महिलेला मारण्यापुरता आहे, हे कबूल करा.” असं आव्हान यावेळी चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना दिलं आहे.

“होय, शिवसेना गुंडगिरी करते, आम्ही सर्टिफाईड गुंड”, संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं!

याचबरोबर “सर्टिफाईड व नॉनसर्टिफाईड गुंडांसोबत चारहात करण्यासाठी महाराष्ट्रातल्या आम्ही जिजाऊच्या लेकी सक्षम आहोत, जय हिंद, जय महाराष्ट्र…!” असं देखील शेवटी चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 8:15 pm

Web Title: we are able to deal with certified and uncertified goons chitra wagh criticized sanjay raut msr 87
टॅग : Bjp,Sanjay Raut,Shiv Sena
Next Stories
1 “महाराष्ट्राने मृत्यू लपवले हा आरोप सहन करणार नाही”, आरोग्यमंत्र्यांनी ठणकावलं!
2 सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा मसूदा लवकर सादर करा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना
3 Coronavirus: …तो पर्यंत मुंबई अनलॉक करणे धोक्याचं; टास्क फोर्सचा इशारा
Just Now!
X