महाविकास आघाडी सरकारला अमर अकबर अँथनीचे सरकार म्हणून भाजपाने हिणवलं. मात्र अमर अकबर अँथनी हा सिनेमा जसा हिट ठरला अगदी तशाचप प्रकारे विधानपरिषद निवडणुकीत आमची आघाडी हिट ठरली आणि रॉबर्टसेठचा पराभव झाला असं म्हणत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला टोला लगावला आहे. भाजपाची तुलना त्यांनी अमर अकबर अँथनी चित्रपटातील व्हिलन अर्थात रॉबर्टसेठशी केली आहे.

विधान परिषदेच्या निकालावर प्रतिक्रीया देताना सचिन सावंत म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या रुपाने लोकशाहीसमोर मोठे संकट उभे आहे. यातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. देशहितासाठी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. यातूनच महाराष्ट्राला एक स्थिर सरकार दिले गेले असून आजचे निकाल हे या तीन पक्षाच्या एकोप्याचे फळ आहे. भाजपाचे १०५ आमदार कामी आले नाहीत. एक जागा मिळाली तीही पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्यामुळे. मस्तवालपणात वागणाऱ्या भाजपासाठी ही मोठी चपराक असून दोन दिवसांपूर्वीच १०५ चे १५० होतील अशा वल्गना करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा भ्रमाचा भोपळा या निकालामुळे फुटला आहे, असा टोला सावंत यांनी लगावला आहे.

विधान परिषद निवडणुकीचा निकाल हा महाविकास आघाडी सरकारवर लोकांनी दाखवलेला विश्वास आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंतचा हा सुशिक्षित मतदार बेरोजगारी, आर्थिक संकटाच्या गर्तेत लोटलेला असून हे नरेंद्र मोदी सरकारमुळेच झालेले आहे हा त्यांचा ग्रह पक्का झालेला आहे.या सुशिक्षित मतदारांचा आक्रोश असून तो राग या मतदारांनी या निवडणुकीतून व्यक्त केलेला आहे, असे सावंत म्हणाले.

अमर, अकबर, अँथनीने, रॉबर्ट शेठचा पराभव केला असून भाजपाच्या परतीचा पराभव सुरु झाला आहे हे मात्र नक्की, असेही सावंत म्हणाले. भाजपाला आता भविष्यातील नामुष्की स्पष्ट दिसत असल्याने ऑपरेशन कमळला आता वेग येईल व ईडी, इन्कमटॅक्ससारख्या यंत्रणांना चवताळून मविआ नेत्यांवर सोडले जाईल असाही आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.