मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली आहे. २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आल्याचे समजते. मात्र मनसे अशा नोटिसीला भीक घालत नाही अशी पहिली प्रतिक्रिया मनसेचे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना दिली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे नवीन हिटलर आहेत. तुमच्या विरोधात बोलेल, तुमची प्रकरणं बाहेर काढेल, तुमचा खोटारडेपणा बाहेर काढेल त्याच्यावरुद्ध दाबावतंत्राचा वापर करायची भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. सीबीआय असेल किंवा ईडी असेल या आता स्वायत्त संस्था राहिलेल्या नाहीत तर त्या भाजपाच्या कार्यकर्त्या झालेल्या आहेत. अशा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी कसं डील करायचं हे मनसेला चांगलं माहितीय. त्यापद्धतीनेच आम्ही डील करु,” असं संदीप देशपांडे यांनी सांगितले.

“ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी ईव्हीएमविरुद्ध आंदोलन सुरु केलं, वेगवेगळ्या राज्यातील नेत्यांच्या भेटी घेतल्या त्याची एक प्रकारची भिती भारतीय जनता पार्टीच्या मनात आहे. गेल्या पाच सहा वर्षात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपाच्या कुठल्या नेत्याची ईडीची किंवा सीबीआयची चौकशी झाली का? यांचे नेते तुरुंगात बसून जे पिडीत आहेत त्यांच्यावर ट्रक घालतात, त्यांचा खून करण्याचा प्रयत्न करतात त्यांची कुठलीही चौकशी होत नाही. मुंबई बँकेचा घोटाळा, प्रकाश मेहतांचा घोटाळा या कुठल्याही प्रकरणात चौकशी झाली नाही. सरकारला फक्त राज ठाकरेच आठवतात. कोहिनूर मिलचं प्रकरण अतिशय जुनं आहे. इतकी वर्ष झाल्यानंतर सरकारला आताच का जाग आली?,” असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला.

दरम्यान राज ठाकरेंना पाठवण्यात आलेल्या या नोटीशीवरुन सरकार सूडबुद्धीचं राजकारण करत असून हा लोकशाहीच्या गळचेपी करण्याचा प्रकार असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.