करोना संकटातही आरोप प्रत्यारोपांचे प्रकार अद्याप सुरुच आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर प्रदेशात झालेल्या करोना मृत्यूंवरुन टीका केली आहे. गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मृतदेह नदीत सोडण्यासाठी मुंबईत तशी नदी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावरुन महापौरांनी भाजपाशासित उत्तर प्रदेशवर जोरदार टीका केली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान शेकडो मृतदेह गंगा नदीमध्ये तरंगताना आढळून आले होते. त्यातील बहुतेक मृतदेह नदीकिनारी पुरण्यात आले होते.

“…त्या पाच वर्षाच्या मुलाचा काय दोष”, मुंबईच्या महापौरांचा प्रश्न

करोनाचे आकडे कधी लपवले नाहीत- महापौर

किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मुंबईत करोनाचे आकडे लपवण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे असा सवाल पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावेळी “आम्ही कधी करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या लपवली नाही. आम्ही मुंबईत असे कधी करणार नाही. आमच्याकडे मृतदेह सोडण्यासाठी तशी नदी नाही. आम्ही त्या कुटुंबांचा सन्मान करतो आणि नियमांनुसार मृत्यूचे प्रमाण पत्र देतो” असे महापौर म्हणाल्या. दुसरीकडे उत्तर प्रदेशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत कानपूर ते बिहारपर्यंत मृतदेह गंगेत टाकण्यात आले होते. जगभरामध्ये याप्रकाराची चर्चा झाली होती.

दरम्यान, महाराष्ट्रात आणि मुंबईत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. महाराष्ट्रात बुधवारी १०,९८९ नवे करोनाबाधित आढळून आले होते. तर २६१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. गेल्या २४ तासांत १६,३७९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या ही १० हजारांच्या आसपास आहे. तर महाराष्ट्रात आतापर्यंत १ लाखांपेक्षाही जास्त लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.