पुलवामा येथील भ्याड हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. अत्यंत दुर्दैवी असा हा हल्ला आहे. या हल्ल्याचा निषेध करत असतानाच पाकिस्तानला या हल्ल्याची जबदस्त किंमत मोजायला लावायची असा निर्धार आपण केला पाहिजे. ४० च्या बदल्यात ४० हजार असे धोरण असले पाहिजे असे मत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर त्यांनी हा व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीचा मथळा हाच आहे की ‘पाकिस्तानला धडा शिकवा, ४० च्या बदल्यात ४० हजार’

पाकिस्तानात पुरस्कृत अतिरेक्यांनी हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात जे जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांना सावरण्याची ताकद इश्वराने त्यांना द्यावी अशी प्रार्थनाही आव्हाड यांनी केली आहे. इतकंच नाही तर या हल्ल्याला आपण त्याच भाषेत उत्तर द्यायला हवं असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानला या हल्ल्याची जबरदस्त किंमत मोजायला लावलीच पाहिजे ही सगळ्या भारतीयांची भावना आहे. इथे आपण राजकारण बाजूला ठेवू, मात्र काश्मिरी तरूण वाट सोडून दहशतवादाकडे का वळत आहेत याचं सुद्धा आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसंच आपल्या चुकलेल्या धोरणांमुळे पाकिस्तानी तरूण दहशतवादाकडे वळत असेल तर ही धोरणं सुधारण्याची गरज आहे असंही मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे. काश्मिरी तरूणांना मुख्य धारेत आणणं ही सगळ्या भारतीयांची सगळ्या राजकारण्यांची जबाबदारी आहे. मात्र त्याचवेळी हेही लक्षात ठेवलं पाहिजे पाकिस्तानला धडा शिकवण्याशिवाय आता पर्याय नाही असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

पहा व्हिडिओ

गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे जवान शहीद झाले. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणला. या घटनेनंतर जे जवान शहीद झाले त्यांच्यासाठी देशभरातून हळहळ व्यक्त होते आहे. तर पाकिस्तानबद्दल सगळ्याच देशाच्या मनात राग आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याच रागाला त्यांच्या शब्दांमधून वाट करून दिली आहे.