01 October 2020

News Flash

लोकल ट्रेन सुरु करा! अन्यथा उपचारांसाठी डॉक्टर व आरोग्यसेवक नसतील!

आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर ठाम

संदीप आचार्य

मुंबईतील करोना रुग्णांची वेगाने वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन रुग्ण व्यवस्थेतील खाटांची संख्याही वेगाने वाढवली जात आहे. मात्र दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी आता लोकल ट्रेन सुरु केली नाही तर डॉक्टर, परिचारिका तसेच आरोग्य व्यवस्थेतील चतुर्थ श्रेणी कमर्चारी नसतील, असा इशारा आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ डॉक्टरांनी दिला आहे. एवढेच नाही तर मुंबईसाठी नेमलेल्या डॉक्टरांच्या कृती दलानेही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सकाळ- संध्याकाळ लोकल ट्रेन सुरु करण्याची सुस्पष्ट भूमिका राज्य सरकारला दिलेल्या अहवालात मांडली आहे.

मुंबईतील करोना रुग्णांची संख्या २२ हजारांहून अधिक झाली असून जून अखेरीस ही संख्या सत्तर हजारापर्यंत पोहोचण्याची भीती आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतील वाढते रुग्ण लक्षात घेऊन महापालिकेने आपल्या रुग्णालयातील करोना रुग्णांसाठीच्या खाटा वाढविण्यास सुरुवात केली आहे. तसेच लक्षणे असलेल्या व ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांसाठी बीकेसी, वरळी, महालक्ष्मी, वेलिंग्टन क्लब, गोरेगाव एनएससी ग्राऊंड तसेच मुलुंड ते दहिसरपर्यंत दहा हजार खाटांची रुग्ण व्यवस्था उभारण्याचे काम हाती घेतले आहे.

हे काम अंतिम टप्प्यात असून यात शंभर खाटांमागे १२ डॉक्टर, १६ परिचारिका तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी मोठ्या संख्येने लागणार आहे. हा सारा वर्ग उपनगरात, विस्तारित उपनगरात तसेच एमएमआर विभागात राहात असून या सर्वांसाठी तसेच अत्यावश्यक सेवेतील अन्य कर्मचाऱ्यांसाठी आता तरी दिवसातून सकाळी दोन वेळा व सायंकाळी दोन वेळा लोकल ट्रेन सुरु करा अन्यथा एवढी मोठी रुग्ण व्यवस्था उभी करूनही काही उपयोग होणार नाही, असे पालिकेतील तसेच आरोग्य क्षेत्रातील अधिष्ठाता व डॉक्टरांनी सांगितले आहे.

“महापालिकेच्या शीव, केईएम तसेच नायर रुग्णालयात आजच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. डॉक्टर, परिचारिका तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी मोठ्या संख्येने क्वारंटाइन झालेले आहेत तर येणे शक्य होत नसल्याने अनुपस्थित असलेल्यांची संख्याही मोठी आहे. आहे तो भार सांभाळणे हेच मोठे आव्हान असून आगामी काळात वाढती रुग्ण संख्या व उपलब्ध खाटांसाठी मनुष्यबळ हवे असल्यास अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी लोकल ट्रेन सुरु झाली पाहिजे” असे स्पष्ट मत नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी मांडले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातत्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामावर येता यावे यासाठी लोकल ट्रेन सुरु करण्याची मागणी केंद्र सरकारकडे लावून धरली आहे. तथापि मुंबईतील सर्वपक्षीय खासदरांनीही यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे असे शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले. खासकरून भाजपाच्या राज्यातील नेत्यांनीही यासाठी केंद्राकडे आग्रही भूमिका मांडली पाहिजे असे हा नेता म्हणाला. मुंबईत आजघडीला पालिका रुग्णालयातील खाटा वाढविण्याबरोबरच लक्षणे असलेल्या व ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी बीकेसी, वरळी, महालक्ष्मी, गोरेगावपासून ते मुलुंड व दहिसरपर्यंत दहा हजार खाटांची व्यवस्था केली जात आहे. ही व्यवस्था अंतिम टप्प्यात असून ७५ हजार संस्थात्मक क्वारंटाइनची व्यवस्था रुग्णांसाठी करण्याचे काम सुरु असून आतापर्यंत ३८ हजार क्वारंटाइनची व्यवस्था झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

तसेच खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा पालिका ताब्यात घेणार असून एवढ्या मोठ्या आरोग्य व्यवस्थेसाठी डॉक्टर, परिचारिका तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसह मोठ्या संख्येने आरोग्य सेवक लागतील. यातील बहुतेक लोक उपनगरात दूर राहात असून आता अत्यावश्यक सेवेसाठी लोकल ट्रेन सुरु झाली पाहिजे, असे मुंबईतील करोना रुग्णांसाठी नेमलेल्या विशेष कृती दलाने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

या कृती दलाचे अध्यक्ष असलेल्या डॉ. संजय ओक यांना विचारले असता, “करोनाची मुंबईतील परिस्थिती लक्षात घेता अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी लोकल ट्रेन सुरु करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले”. प्रिन्स अली खान रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले डॉ. ओक यांनी त्यांच्याच रुग्णालयाची परिस्थिती सांगितली. “१५० खाटा असलेल्या प्रिन्स अली खान रुग्णालयात एकूण ९०० कर्मचारी असून साधारणपणे दीडशे कर्मचार्यांच्या मदतीने रुग्णालयाचे काम सध्या सुरु आहे. अशीच परिस्थिती बहुतेक रुग्णालयांची असून किमान अत्यावश्यक सेवेतील कर्मचार् यांसाठी लोकल ट्रेन सुरु केल्या नाहीत तर पावसाळ्यात काय होईल कल्पनाही करता येणार नाही”, असे डॉ. संजय ओक म्हणाले.

करोनाचा सामना करण्यासाठी लोकल ट्रेन सुरु केली नाही तर मनुष्यबळ कोठून आणायचे असा सवाल वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केला. रुग्णांना परिणामकारक सेवा देऊन जास्तीतजास्त मृत्यू रोखणे हे आव्हान आहे. केवळ डॉक्टर नाही तर त्यासाठी आरोग्य व्यवस्थेतील अन्य घटकही महत्वाचे असतात. आरोग्य व्यवस्थेतील अनेकांची कामावर येण्याची इच्छा आहे मात्र वाहतुकीची व्यवस्था नसल्यानेच ते येऊ शकत नाही. अशावेळी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन लवकरच लोकल  सुरु होण्याची गरज असल्याचे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2020 4:53 pm

Web Title: we need to start mumbai local demands doctors task force to government scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 धारावीतील रुग्णांसाठी जैन फाऊंडेशनच्या २५ रुग्णवाहिका!
2 अरब देशातील मराठी कुटुंबांना आणा – मुख्यमंत्र्यांकडे मनसेची मागणी
3 ‘त्या’ गोष्टीवर आदित्य ठाकरेंचा फोटो छापल्याने युवासेनेला मनसे टोला; म्हणाले…
Just Now!
X