शरद पवारांवर आम्ही विश्वास ठेवत नाही. पवार जे बोलतात ते कधीच करत नाहीत आणि करतात ते बोलत नाहीत असा इतिहास आहे, अशा खोचक शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शरद पवारांना लक्ष्य केले. राज्यात स्थिर सरकार यावे म्हणून पाठिंबा देण्याचे वक्तव्य करणारे पवार आज मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार राहण्याचे विधान करतात. त्यामुळे पवार कधी काय बोलतात हे त्यांच्याच लक्षात राहत नाही. मतदार राजा पवार साहेबांना माफ कर, पवार काय करतात आणि काय बोलतात हे त्यांना कळत नाही, असा उपरोधिक टोला उध्दव यांनी पवारांना लगावला तर, ज्यांच्याबरोबर गेली २५ वर्षे राहिलो ते या निवडणुकीत आमच्या विरोधात लढले आणि आम्ही ज्यांच्या विरोधात होतो त्यांना ते सोबत घेत आहेत. त्यामुळे दुर्देवाने कोण कोणाबरोबर आहे ते कळतच नाही, अशी उध्दव यांनी भाजपवर टीका केली.

शिवसेना तुर्तास विरोधी पक्षातच

महाराष्ट्रातील राजकारण सध्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये पोचले असल्याचे सांगत उध्दव यांनी भाजपवर टीका केली. तसेच शिवसेना तुर्तास तरी विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे निभावेल, असंही ते पुढे म्हणाले. पाच वर्षे विरोधातच राहणार का यावर आता उत्तर द्यायची गरज नाही. जेव्हा चं तेव्हा बघू  परंतु, तुर्तास तरी राज्यातील राजकीय अस्थिरता संपत नाही तोपर्यंत शिवसेना विरोधी पक्ष म्हणूनच काम करेल असे उध्दव यांनी स्पष्ट केले.

राज भेटीमागे राजकारण नाही

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सोमवारी द्वितीय स्मृतीदिनानिमित्त राज्यभरातून सर्व क्षेत्रातील मान्यवर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी स्मृतिस्थळावर आले होते. त्यामध्ये राजकीय नेत्यांचाही समावेश होता. फडणवीस यांच्यासह काही भाजप नेते, शरद पवार आणि राज ठाकरे देखील आदरांजली वाहण्यासाठी स्मृतिस्थळावर आले होते. राज यांच्या उपस्थितीमागे कोणतेही राजकारण नव्हते आणि एवढा वरवरचा विचार कोणीही करू नये, असे उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले. भविष्यात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या समिकरणांबाबत विचाण्यात आले असता, एकत्र येण्याबाबत अद्याप विचार केलेला नसल्याचे उध्दव यावेळी म्हणाले.