X
X

“आम्ही दर्ग्याबाहेर दाऊदच्या खात्म्यासाठी तयार होतो, मात्र…”

READ IN APP

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इ्ब्राहिम हा पाकिस्तानमधील कराची शहरात राहत असल्याचे वारंवार समोर आले आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमधील कराची शहरात राहत असल्याचे वारंवार समोर आले आहे. दरम्यान, याच शहरातील एका दर्ग्याबाहेर आम्ही दाऊदला ठार करण्यासाठी सापळा रचला होता, असा मोठा खुलासा कुख्यात एजाज लकडावाला याने पोलिसांसोबत चौकशीदरम्यान केला आहे.

सन १९९८ मध्ये छोटा राजनचा विश्वासू सहकारी असलेल्या विकी मलहोत्रासोबत दहा जण यासाठी काम करीत होते, असे लकडवाला याने मुंबई पोलिसांना सांगितले. काही दिवसांपूर्वीच त्याला मुंबई पोलिसांनी पाटणा येथील विमानतळावरुन ताब्यात घेतले आहे. दरम्यान, तो सध्या कोठडीत असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

“भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने छोटा राजनचा दाऊदला ठार करण्याचा डाव होता. त्यावेळी मी विकी मलहोत्राच्या टीमचा भाग होतो. यामध्ये फरीद तानाशा, बाळू डोकरे, विनोद मतकर, संजय घाटे आणि बाबा रेड्डी यांचाही समावेश होता. दाऊदची मुलगी मारिया हिच्या निधनानंतर तिच्या अंत्यविधीसाठी दाऊद कराचीतील एका दर्ग्यात येणार होता. याचवेळी त्याला ठार करण्यासाठी आम्ही त्या दर्ग्याबाहेर तयार होतो,” असे लकडावला याने पोलिसांशी बोलताना सांगितले.

“पण, दाऊदचा जवळचा सहकारी आणि नेपाळचा खासदार असलेल्या मिर्झा दिलशाद बेग याने दाऊदला शेवटच्या क्षणी आमच्या कटाची माहिती दिली, त्यामुळे आमचा दाऊदला ठार करण्याचा प्रयत्न फसला. यामुळे नाना (छोटा राजन) बेगवर खूपच चिडला होता. त्यानंतर त्याचवर्षी त्याने बेगचा खून केला,” असंही लकडावला याने पोलिसांना सांगितलं आहे.

24
X