आदिवासींच्या जमिनी विक्रीसाठी खुल्या करुन त्या मूठभर उद्योजक, बिल्डर, व्यापारी यांच्या घशात घालण्याचा राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रसंगी रस्त्यावर उतरेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.
आदिवासींची फसवणूक-लुबाडणूक होऊ नये म्हणून त्यांच्या जमिनीला कायद्याने संरक्षण दिले आहे. परंतु हे संरक्षण काढून घेऊन त्यांच्या जमिनी बिगर आदिवासींना विकण्यास परवानगी देण्याचे घाटत आहे. परंतु काँग्रेस पक्ष ते होऊ देणार नाही, आदिवासींच्या संरक्षणासाठी आंदोलनाची आमची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमी अधिग्रहण अध्यादेश काढला जाणार नाही, असे जाहीर केले; परंतु त्यांची ती मनकी बात नव्हती तर, काँग्रेसने त्या शेतकरीविरोधी अध्यादेशाला केलेला कडाडून विरोध लक्षात घेऊन त्यांना जन की बात बोलावी लागली, अशी उपरोधिक टीका चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याबाबत पंतप्रधानांचे अभिनंदन करीत असले तरी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने संसदेत आणि संसदेच्या बाहेर जी कणखर भूमिका घेतली, प्रसंगी आंदोलने केली, त्यामुळे पंतप्रधानांना माघार घ्यावी लागली, असा दावा त्यांनी केला.
राज्यात विशेषत: मराठवाडय़ातील दुष्काळी परिस्थिती भयानक आहे. केंद्रीय कृषीमंत्री, केंद्रीय पथकांचे आता पर्यंत अनेक दौरे झाले. उद्यापासून मुख्यमंत्रीही मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर जात आहेत.
आता दौरे बस्स झाले, जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, अशामागण्या त्यांनी केल्या. सरकारने दुष्काळी परिस्थितीत नीट हाताळली नाही, तर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला.
राणे स्वयंभू नेते
काँग्रेस नेते नारायण राणे स्वंतत्रपणे दुष्काळी भागाचा दौरा करीत आहेत, याकडे अशोक चव्हाण यांचे लक्ष वेधले असता, आपल्याशी चर्चा करुनच ते दौऱ्यावर गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना स्थनिक कार्यकर्ते मदत करीत नाहीत, अशी चर्चा आहे, त्यावर राणे पक्षाचे ज्येष्ठ व स्वयंभू नेते आहेत, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.