बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यावर शिक्षकांनी घातलेला बहिष्कार मागे घेतला असल्याचे सरकारतर्फे बुधवारी दुपारी विधानसभेत सांगण्यात आले. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी यासंदर्भात माहिती दिली.
बारावीचा निकाल वेळेतच लावण्यात येईल, असे आश्वासन राजेंद्र दर्डा यांनी बुधवारी विधान परिषदेत दिले होते. माध्यमिक शिक्षकांच्या आणि प्राध्यापकांच्या संघटनेशी येत्या दोन दिवसांत चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर निश्चितपणे तोडगा काढला जाईल, असे त्यांनी सांगितले होते. विरोधकांनी विधान परिषदेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शिक्षणमंत्र्यांनी हे आश्वासन दिले होते. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास दर्डा यांनी शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्यावर टाकलेला बहिष्कार मागे घेतला असल्याचे सभागृहात सांगितले.