संसदेत चर्चेविना कृषी कायदे मंजूर करून मोदी सरकारने भारतीय राज्यघटनेचाच अपमान के ला आहे. या कायद्यांना आमचा विरोध आहेच, मात्र त्याचबरोबर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू पाहणाऱ्यांना सामान्य जनता व शेतकरीच उद्ध्वस्त के ल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी दिला. डाव्या पक्षांनी आयोजित केलेल्या शेतकरी मोर्चात ते बोलत होते. या मोर्चाद्वारे डाव्या पक्षांसह शेतकऱ्यांनी शक्तिप्रदर्शन केले.

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणीत किसान सभा तसेच संयुक्त कामगार-शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित के लेल्या या मोर्चात मोठय़ा संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठिंबा जाहीर केला होता. आझाद मैदानात झालेल्या जाहीर सभेत शरद पवार तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सहभागी झाले होते.

सभेत बोलताना शरद पवार यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात टीके ची झोड उठवली. दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशमधील शेतकरी जमले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी थंडी-वाऱ्याची तमा न बाळगता मुंबईत जमले आहेत. मात्र, ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांच्या मनात शेतकऱ्यांबद्दल अजिबात आस्था दिसत नाही. ६० दिवस झाले तरी शेतकरी थंडी-वाऱ्यात दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी त्यांची चौकशी तरी केली का, असा प्रश्न त्यांनी विचारला. आंदोलन करणारे पंजाबचे शेतकरी आहेत, अशी या आंदोलनाची संभावना के ली जाते. पंजाब म्हणजे काय पाकिस्तान आहे, असा सवाल त्यांनी केला.

तिन्ही कृषी कायद्यांवर चर्चा झाली पाहिजे, अशी विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका होती. संसदेच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे ही विधेयके पाठवा तिथे चर्चा करू, अशी आम्ही मागणी केली. परंतु चर्चा नाही, समिती नाही; जी विधेयके  मांडली ती जशीच्या तशी मंजूर झाली पाहिजेत, अशी भूमिका सरकारने घेतली. सरकारने चर्चा न करता हे कायदे मंजूर करून टाकले. त्यामुळे शेतकरी गप्प बसणार नाहीत आणि ते मोदी सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असेही पवार म्हणाले.

मोदी सरकारने कामगार व शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरच घाला घातला असून, आता तुमचा सातबारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा डाव रचला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. हे कायदे फक्त भांडवलदार, साठेबाज, नफेखोरांसाठी असून, ते रद्द झालेच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

पूर्वीच्या काळी ‘हम दो, हमारे दो’ अशी कुटुंब नियोजाची घोषणा होती. सध्या मोदी- शहा व अंबानी-अदानी अशी ‘हम दो, हमारे दो’ची व्याख्या करावी लागते, अशी खोचक टीका किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी केली.

डाव्यांचे मुंबईत दुसऱ्यांदा शक्तिप्रदर्शन

डाव्या पक्षांनी अलीकडच्या काळात मुंबईत दुसऱ्यांदा शक्तिप्रदर्शन के ले. यापूर्वी २०१८ मार्चमध्ये आदिवासींच्या प्रश्नांवर नाशिक ते मुंबई असा पायी मोर्चा काढण्यात आला होता. हजारो आदिवासी बांधव तेव्हा नाशिकहून चालत मुंबईत आले होते. त्या वेळी अनवाणी चालल्याने काही आदिवासी पुरुष व महिलांच्या पायांना भेगा पडल्या होत्या व त्याला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर शेतकरी आणि कामगार कायद्यांच्या विरोधात काढलेला हा दुसरा मोर्चा. दोन्ही मोर्चे यशस्वी झाले आणि मुंबईकरांनी त्याला चांगला प्रतिसाद दिल्याचा दावा किसान मोर्चाचे सरचिटणीस डॉ. अनिल नवले यांनी के ला.

शिवसेना दूर

आझाद मैदानातील शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीतील दोन पक्षांचे नेते उपस्थित असताना शिवसेनेचा एकही मोठा नेता, मंत्री या आंदोलनाला हजर राहिला नाही. त्यामुळे शिवसेनेने या मोर्चापासून अंतर राखल्याचे चित्र समोर आले. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करणारी शिवसेना ऐन आंदोलनावेळी गैरहजर का, याची चर्चा रंगली होती. शेतकरी कायद्यांचे लोकसभेत शिवसेनेने समर्थनच केले होते.

निवेदन फाडून राज्यपालांचा निषेध

आझाद मैदानावरील सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांनी राजभवनाकडे कूच केली, परंतु मेट्रो चित्रपटगृहाच्या समोरील चौकात पोलिसांनी मोर्चा अडवला. या वेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चाचे नेतृत्व करणारे भाई जगताप, नसीम खान, अजित नवले, मेधा पाटकर, अशोक ढवळे, चरणसिंह सप्रा, सचिन सावंत आदींनी पोलिसांचे कडे तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी तो यशस्वी होऊ दिला नाही. अखेर राज्यपालांना देण्यासाठी तयार करण्यात आलेले निवेदन जाहीरपणे फाडून टाकू न त्यांचा निषेध करण्यात आला. शेतकरी मोर्चाच्या मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठविण्यात येईल, असे या वेळी जाहीर करण्यात आले.

राज्यपालांवार टीका

कंगनाला भेटायला राज्यपालांकडे वेळ आहे, परंतु माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, असा टोला पवार यांनी लगावला. महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या इतिहासात असे राज्यपाल झाले नाहीत, असे पवार म्हणाले. राज्यपालांना देण्यात येणारे निवेदन फाडून आंदोलकांनी राज्यपालांचा निषेध केला.

‘गोवा दौरा पूर्वनियोजित’

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे गोव्याच्या विधानसभेत सोमवारी अभिभाषण होते. यामुळे ते मुंबईत आंदोलकांच्या शिष्टमंडळाला भेटू शकणार नाहीत, याची पूर्वकल्पना संयोजकांना देण्यात आली होती, असे स्पष्टीकरण राजभवनने दिले.

दिल्लीत आज ‘ट्रॅक्टर मोर्चा’

नवी दिल्ली : दिल्लीत राजपथावर प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या पथसंचलनाप्रमाणे मंगळवारी राजधानीच्या परिघावर शेतकऱ्यांचे ‘पथसंचलन’ होणार असून, त्यांच्या ‘ट्रॅक्टर मोर्चा’कडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या मोर्चात २.५ लाख ट्रॅक्टर, तर पाच लाख शेतकरी सहभागी होतील, असा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला आहे.