ठाणे हे जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक करण्याची तीन वर्षांपूर्वी झालेली घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार राजन विचारे यांनी येथे दिली.
‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात विचारे यांनी ठाण्यातील रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या, मेट्रो रेल्वे, ठाणे शहराचे नागरी प्रश्न आणि सीआरझेडच्या नियमांमुळे नवी मुंबईत उद्भवणाऱ्या अडचणींचा ऊहापोह केला.
भारतातील पहिली रेल्वेगाडी ठाणे- बोरीबंदर या मार्गावर धावल्यामुळे ठाणे हे ऐतिहासिक रेल्वे स्थानक असल्याचे सांगून विचारे म्हणाले, की ठाणे हे जागतिक दर्जाचे रेल्वेस्थानक करण्याची घोषणा तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीन वर्षांपूर्वीच केली होती. परंतु अद्याप तिची अंमलबजावणी झालेली नाही. ठाण्यातून दररोज ६ ते ७ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यांना चांगल्या सेवासुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
मेट्रो रेल्वेसाठी ठाणे महापालिकेने ३०० एकर जमीन राखून ठेवली आहे. परंतु मेट्रो ठाण्यात धावण्यासाठी ठोस निर्णय नाही. आता राज्यात आमचे सरकार आल्यानंतर मेट्रोचे स्वप्न आम्ही प्रत्यक्षात आणू, असे विचारे यांनी सांगितले.
सीआरझेड कायद्यामुळे अडलेले नवी मुंबईतील प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
(‘आयडिया एक्चेंज’चा सविस्तर वृत्तान्त रविवार, २२ जूनच्या अंकात)