सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यात उद्या नव्या सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. त्यानुसार, सभागृहात उद्या आम्ही बहुमत सिद्ध करु असा विश्वास भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

दानवे म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आम्ही आदर करतो. त्यामुळे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीला आम्ही सामोरे जाऊ तसेच यावेळी सभागृहात बहुमतही सिद्ध करु. दरम्यान, आज (मंगळवार) रात्री मुंबईतील गरवारे क्लब येथे भाजपाच्या आमदारांची बैठक होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आणखा वाचा- बहुमत सिद्ध करुनच दाखवू : चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्वपूर्ण निर्णय दिला. राज्यामधील घोडेबाजार थांबवण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेणे गरजेचे असल्याचे सांगत कोर्टाने उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचे तसेच याचे थेट प्रक्षेपण करण्याचेही आदेश दिले आहेत. त्याचबरोबर यासाठी हंगामी व स्थायी अध्यक्षांची नेमणूक करून उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आमदारांना शपथ देण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले.

आणखा वाचा- “उद्या सायंकाळपर्यंत भाजपाचा खेळ संपल्याचे स्पष्ट होईल”

देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्याचा राज्यपालांचा निर्णय बेकायदा असल्याचा मुद्दा उपस्थित करत या निर्णयाविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर रविवारी आणि सोमवारी कोर्टाने दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर आज यासंदर्भातील महत्वपूर्ण निर्णय दिला. न्या. एन. व्ही. रमण, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजीव खन्ना यांच्या तीन सदस्यीय खंठपीठाने हा निर्णय दिला आहे.