दहशतवादाविरोधात आवाज उठवताना स्वत:वर गोळ्या झेलणारी मलाला युसूफजई भारतात आली तर शिवसेना तिचं स्वागतच करेल, असं प्रत्युत्तर शिवसेनेने सुधींद्र कुलकर्णी यांना दिलं आहे.  ऑब्जव्‍‌र्हर रिसर्च फाऊंडेशनचे(ओआरएफ) सुधींद्र कुलकर्णी यांनी नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफजईच्या कार्याचा उल्लेख करत शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. मलालाने तालिबान्यांचा हल्ला झेलला आहे. दहशतवादाविरोधात लढणाऱया मलालाचा ती पाकिस्तानी असल्यामुळे तुम्ही तिचाही विरोध करणार का? असा सवाल सुधींद्र कुलकर्णी यांनी एका टेलिव्हिजन कार्यक्रमात उपस्थित केला होता. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. मलालाने दहशतवादाविरोधात लढा दिला आहे. शिवसेना मलालाला विरोध करणार नाही, असे संजय राऊत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

मलालाने दहशतवाद्यांच्या गोळ्या झेलल्या आहेत. दहशतवादाविरोधात तिचा आजही संघर्ष सुरू आहे. त्यामुळे जर ती भारतात आली तर शिवसेना या वीर मुलीचे स्वागतच करेल ,असे राऊत म्हणाले. मलालाचे स्वागत करू पण पाकिस्तानी कलाकारांना महाराष्ट्राच्या मातीत पाय ठेवू देणार नाही, असेही ते पुढे म्हणाले. दहशतवादाविरोधात लढा दिला पाहिजे ही आमची भूमिका असून मलालाच्या स्वागताने भारतात जे पाकप्रेमी आहेत त्यांना योग्य तो धडा मिळेल, असा टोला देखील राऊत यांनी लगावला.

दरम्यान, पाकिस्तानविरोधी भूमिकेवरून सध्या आक्रमक झालेल्या शिवसेनेने आता बॉलीवूड कलाकार फवाद खान आणि माहिरा खान यांना लक्ष्य करण्याचे ठरविले आहे. या दोघांनाही त्यांच्या एकाही चित्रपटाचे महाराष्ट्रात प्रमोशन करू देणार नाही, असा पवित्रा सेनेने घेतला आहे.